भारत हा माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीच्या उंबरठ्यावर असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते मंगळवारी बंगळुरूतील इंडो-जर्मन उद्योग परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी परदेशी गुंतवणूकीसंदर्भात महत्त्वपूर्ण असलेल्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. परदेशी गुणवत्ता, तंत्रज्ञान आणि गुंतवणूकीचा पुरेपूर लाभ घेण्यासाठीची भारतातील आत्ताची परिस्थिती अभूतपूर्व अशी आहे.

नक्की वाचा :- जर्मनी भारताचा नैसर्गिक भागीदार- नरेंद्र मोदी

 

या सगळ्यामुळे सध्या भारतात गुंतवणूक करणे परदेशी गुंतवणूकदारांसाठी शहाणपणाचे ठरेल, असे मोदींनी सांगितले. गेल्या दीड वर्षाच्या काळात जागतिक पातळीवर भारताने पुन्हा एकदा विश्वासर्हता कमावली आहे. गुंतवणूकीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कर धोरणात पारदर्शकता आणि निश्चितपणा आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

याशिवाय, परदेशी गुंतवणूकदार आणि उद्योगांच्या बौद्धिक संपदेला भारतात योग्य ते संरक्षण मिळेल, असे आश्वासनही मोदींनी या परिषदेत दिले. आगामी वर्षात जीएसटी विधेयक मार्गी लागेल, अशी आम्हाला आशा आहे. खासगी आणि परदेशी गुंतवणूकीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून भारत भविष्यात भारत जोमाने विकास करेल असे भाकित वर्तविले आहे. त्यामुळे भारतातील गुंतवणूकीला उज्ज्वल भविष्य आहे. सध्या आम्ही योग्य दिशेने मार्गक्रमण करत असलो तरी आम्हाला अल्पसंतुष्ट राहून चालणार नाही, असे मोदींनी यावेळी सांगितले.