नेपाळसह भारतात झालेल्या भीषण भूकंपानंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या प्रत्येक भारतीयास मायदेशी सुखरूप आणण्यासोबतच केंद्र सरकारने स्थानिक नागरिकांच्या बचावासाठी मोठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
नेपाळमधील बचावकार्यास भारताने ‘ऑपरेशन मैत्री’ असे नाव दिले आहे.  भूकंपात मरण पावलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांना सहा लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान कार्यालयाने केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर व परराष्ट्र खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रातील पर्यटक सुखरूप
महाराष्ट्रातील पर्यटकांची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झाली नसली, तरी राज्यातील सुमारे १२०० पर्यटक भूकंपग्रस्त नेपाळमध्ये अडकले असावेत असा अंदाज असून त्यापैकी एक हजार जणांशी नियंत्रण कक्षामार्फत संपर्क झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हवाई दलाच्या विशेष विमानाने त्यांना नवी दिल्लीत आणले जात असून सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यातील किती पर्यटक अडकले आहेत, याबाबत नेमकी माहिती लवकरच हाती येईल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.