अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस हे या आठवड्यात भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण संबंधांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर २२ मानवरहित ड्रोन खरेदीच्या योजनेलाही या दौऱ्यादरम्यान मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

समुद्री सीमांवर नजर ठेवण्यासाठी भारत या ड्रोनचा वापर करण्याची शक्यता आहे. जर या योजनेला मंजुरी मिळाली तर भारतीय नौदलाकडे जगातील सर्वात प्रगत शैलीचे ड्रोन असतील यात शंकाच नाही. या ड्रोनद्वारे चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या कारवायांना उत्तर देणे शक्य होणार आहे. ड्रोनची ताकद भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढवण्यात हातभार लावणार आहे. त्याचमुळे मॅटिस आणि मोदी यांच्या भेटी दरम्यान काय होते? याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

जेम्स मॅटिस यांच्या दौऱ्यादरम्यान सागरी सीमेची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे अशी माहिती ‘एनडीटीव्ही’ने दिली आहे. भारताच्या समुद्री सीमारेषांवर चीनने नजर ठेवण्यास सुरूवात केली आहे, त्याचमुळे मॅटिस यांच्या भारत दौऱ्यादरम्यान ड्रोन कराराला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील सुरक्षा करार वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने जेम्स मॅटिस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होणार आहे.

जेम्स मॅटिस हे आपल्या भारत दौऱ्यात संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही भेट घेणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यापासून पहिल्यांदाच मॅटिस भारत दौऱ्यावर येत आहेत. चीन आणि पाकिस्तानकडून भारताच्या कुरापती काढण्याचे सत्र थांबताना दिसत नाही. अशातही मॅटिस यांच्या दौऱ्यादरम्यान ड्रोन खरेदीच्या प्रकल्पाला मंजुरी मिळते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.