लष्करप्रमुख जनरल रावत यांचे प्रतिपादन

पुढील युद्ध स्वदेशी शस्त्रास्त्रांनिशी लढले जावे, अशी अपेक्षा लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी व्यक्त केली. लष्कर आणि इंडियन टेक्निकल टेक्स्टाइल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. नॅशनल टेक्स्टाइल कॉर्पोरेशन लष्कराला लागणाऱ्या कपडे व अन्य उत्पादनांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करणार असल्याचे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी यावेळी सांगितले.

जनरल रावत म्हणाले की, अशा चर्चासत्रांतील विचार केवळ शासकीय नोंदीमध्ये राहता कामा नयेत. सेनादले आणि औद्योगिक विश्वात समन्वय असला पाहिजे. देशाच्या सेनादलांना लागणारी शस्त्रास्त्रे आणि अन्य उपकरणे देशातीलच उद्योगांनी बनवली पाहिजेत. भारताने पुढील युद्ध स्वदेशी शस्त्रास्त्रांनिशी लढले पाहिजे. आज भारतीय उत्पादक अमेरिकेच्या सैन्याला लष्करी गणवेश आणि अन्य वस्तू पुरवत करत आहेत. भारतीय सैन्यालाही अशा उत्पादनांची मोठी गरज आहे आणि त्यासाठी त्यांच्याकडे मोठी आर्थिक तरतूदही आहे. त्याचा स्वदेशी उत्पादकांनी लाभ घेतला पाहिजे.