गेल्या ७० वर्षांपासून भारत पाकिस्तानशी समर्थपणे सामना करत आहे. त्यामुळे दहशतवादाला सक्षमपणे तोंड देण्यासाठी भारताची सुरक्षा यंत्रणा सर्वोच्च असायला हवी. त्यासाठी देशाने स्वयंसिद्ध व्हायला हवे, असे मत संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी केले. कर्नाटकमधील चित्रदुर्गजवळ देशातील पहिल्या ‘एरोनॉटीकल टेस्ट रेंज’चे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पाहिले तर, भौगोलिक स्थितीमुळे देशावरील संकटांपासून मुक्तता होऊ शकत नाही. गेल्या सात दशकांपासून शेजारी देशापासून भारताच्या सुरक्षिततेला धोका असल्याचे पाहायला मिळते. देशाला त्याचा सामना करावा लागत आहे, असे जेटली यांनी सांगितले. पाकिस्तानचा निपटारा करण्यासाठी भारताने सुरक्षेच्या बाबतीत सक्षम असणे अत्यावश्यक आहे, असेही ते म्हणाले. स्वदेशात तयार झालेल्या मानवरहित आणि मानव संचलित विमानांचे परीक्षण या एरोनॉटीकल टेस्ट रेंजमध्ये केले जाणार आहे. बंगळुरुपासून हे केंद्र केवळ २५० किलोमीटर अंतरावर आहे. कोणताही देश सुरक्षिततेच्या बाबतीत इतर देशांवर अवलंबून असेल, तर तो कधीच सुरक्षित राहू शकत नाही. त्यामुळे देशात संरक्षणासंबंधी अधिकाधिक स्वदेशी केंद्रे उभारण्याची आवश्यकता असल्याचे जेटली यांनी यावेळी सांगितले.

गेल्या ७० वर्षांपासून शेजारी देश आपल्यासाठी डोकेदुखी ठरत असून, त्यांना बदलू शकत नाही. पण इतिहास बदलू शकतो, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. देशात आयआयटी, डिआरडिओ यांसारख्या अनेक खासगी संस्था उत्तम काम करत आहेत. त्यामुळे संरक्षणाच्या बाबतीतील स्वयंसिद्धता साध्य करणे शक्य आहे, असे सांगत मागील काही वर्षांत असणाऱ्या युपीए सरकारने अनेक गोष्टींमध्ये ठोस निर्णय न घेतल्याने आपण मागे राहिलो, असा आरोपही त्यांनी केला.