पायाभूत विकास ही जागतिक आर्थिक मंदीसदृश स्थिती थांबवण्याची गुरुकिल्ली आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. भारतात पायाभूत क्षेत्रात येत्या १० वर्षांत १.५ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सच्या गुंतवणुकीची गरज असून, भारतात जगातील देशांनी गुंतवणूक करावी असे त्यांनी स्पष्ट केले.

आशियाई पायाभूत गुंतवणूक बँकेच्या गव्हर्नर्सच्या बैठकीसाठी येथे आले असताना त्यांनी सांगितले, की आम्हाला जागतिक मंदीसदृश स्थितीतही आर्थिक वाढीचा वेग कायम राखायचा आहे, त्यासाठी पायाभूत क्षेत्राचा विकास व त्यातील गुंतवणूक महत्त्वाची आहे. पायाभूत सुविधांत दीड ट्रिलियन डॉलर्स गुंतवणुकीची गरज आहे. काही क्षेत्रातील किमती कमी झाल्यामुळे काही अतिरिक्त अर्थसाधने आमच्याकडे आहेत. सरकार हजारो खेडी २०१९ पर्यंत आधुनिकीकरण योजनेत जोडणार आहे. पायाभूत विकास ही जागतिक आर्थिक मंदीसदृश वातावरण कमी करण्याची गुरुकिल्ली आहे. आशियाई पायाभूत विकास बँकेने आयोजित केलेल्या पायाभूत सुविधा व जागतिक आर्थिक वाढ या विषयावर आयोजित परिषदेत ते बोलत होते. पुढील काही दशकांत जगात पायाभूत सुविधांतील गुंतवणुकीची तफावत भरण्यासाठी ट्रिलियन्स डॉलर्सची गरज राहील, त्यामुळे जग सध्याच्या मंदीसदृश स्थितीतून बाहेर येणे गरजेचे आहे व त्यात पायाभूत विकास महत्त्वाचा आहे. महामार्ग विकासाचे वर्षांचे उद्दिष्ट १० हजार किमी असून रेल्वेला आता १०० वर्षे होऊन गेली आहेत, त्यात आधुनिकीकरणाची गरज आहे. रेल्वे स्टेशनवर व्यावसायिक केंद्रांचे प्रयत्न चालू आहेत. सरकार अधिक विमानतळे, बंदरे बांधू इच्छिते व त्यात पुनर्नवीकरणीय ऊर्जा निर्माण करण्याचाही प्रयत्न आहे.