भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमधील संबंध सुधारावेत यासाठी भारताने नेहमीच प्रयत्न केले. मात्र पाकिस्तान संवाद प्रक्रियेत अडथळे निर्माण करत आहे. असे असले तरी चर्चाप्रक्रियेला खीळ बसली आहे, असे आम्ही मानत नाही, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी स्पष्ट केले. पाकिस्तानने कितीही अडथळे निर्माण केले तरी संवाद प्रक्रिया थांबणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
पाकिस्तानने काश्मिरी फुटीरतावाद्यांशी चर्चा सुरू केल्याने पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर परिणाम होऊ शकेल काय, असे विचारता स्वराज म्हणाल्या, ‘‘पाकिस्तानकडून ही अपेक्षा नव्हती. काश्मिरी फुटीरतावादी हा भारताचा अंतर्गत विषय असून, त्यात पाकिस्तानने ढवळाढवळ करणे गरजेचे नाही.’’ सध्या संवाद प्रक्रियेत स्वल्पविराम किंवा अर्धविराम आला आहे, असे समजावे. भविष्यात संवाद प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा भारताचा प्रयत्न असेल, असे स्वराज यांनी सांगितले.
न्यूयॉर्कमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पंतप्रधान मोदी हे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेणार का, याबाबत विचारले असता स्वराज यांनी सांगितले, त्यावेळी परिस्थिती कशी असेल यावर ही भेट अवलंबून आहे. मात्र ही भेट पूर्वनियोजित नसेल, हे मात्र निश्चित. या आमसभेच्या पाश्र्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि मोदी यांच्यात ३० सप्टेंबरला चर्चा होईल, असे मात्र त्यांनी सांगितले.

बांगलादेशशी चर्चा
भारत आणि बांगला देश संयुक्त सल्लागार मंडळाची बैठक २० सप्टेंबरला होणार आहे. यात तिस्ता पाणी करार आणि सीमा करारावर चर्चा अपेक्षित असल्याची माहितीही स्वराज यांनी दिली. सीमा फेररचना करारानुसार उभय देशांत १६० क्षेत्रांचे फेरवाटप होणार आहे. पश्चिम बंगालने मात्र इंचभरही जमीन बांगला देशला दिली जाणार नसल्याचे जाहीर केले आहे.