येत्या शतकात जागतिक महासत्ता बनण्याची क्षमता भारताकडे असून या क्षमतेला कोणी कमी लेखू नये, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॉट् यांनी नमूद केले आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जारी केलेल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
भारतीय वंशाचे साडेचार लाख लोक ऑस्ट्रेलियाचे नागरिक असून त्यांनी निष्ठेने, कठोर परिश्रमांनी आणि सच्च्या भावनेने ऑस्ट्रेलियाच्या जडणघडणीत वाटा उचलला आहे, असाही गौरव त्यांनी केला.
अबॉट् पुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येत असून आपल्या या संदेशात त्यांनी पंडित नेहरू यांचा उल्लेख केला आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नेहरू यांनी भाषणात म्हटले होते की, ‘भारतात उद्या पहाट होईल ती स्वातंत्र्य आणि नवजीवनाची आणि देशही जुन्याकडून नव्याकडे पाऊल टाकेल.’ नेहरू यांची ही ग्वाही वास्तवात उतरल्याचे आजच्या प्रगतशील भारताकडे पाहून जाणवते, असेही अबॉट् यांनी म्हटले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियातील व्यापारक्षेत्रातील वार्षिक उलाढाल ही १५ अब्ज डॉलरपेक्षा अधिक असून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये जी-२० परिषदेच्या निमित्ताने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रिस्बेनमध्ये स्वागत करीन, असेही त्यांनी नमूद केले आहे. १९८६नंतर ऑस्ट्रेलियाला भेट देणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरणार आहेत.