भारतीय टपाल विभागाची इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) वेगाने विस्तार करणार आहे. देशभरातील १.५५ लाख टपाल कार्यालयांमध्ये पेमेंट बँक सुरू करण्यात येणार असून याद्वारे सर्व आर्थिक सेवा पुरवण्यात येणार आहेत. २०१८ अखेरीपर्यंत १.५५ लाख टपाल कार्यालये आणि तीन लाख कर्मचाऱ्यांमार्फत ही सेवा दिली जाईल.

इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही देशातील दुसरी सर्वात मोठी बँक असेल. मार्च २०१८ पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात पोस्ट बँक सुरू होईल. सर्व १.५५ लाख टपाल कार्यालयांत पेमेंट बँकची सुविधा देण्यात येईल. तसेच पोस्टमन आणि ग्रामीण टपाल सेवकांकडे पेमेंट सुविधा देणारी उपकरणे असणार आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. पी. सिंह यांनी संयुक्त राष्ट्र संघात आयोजित एका कार्यक्रमात ही माहिती दिली.

ही पेमेंट बँक एका व्यक्तीकडून अथवा एका लघुद्योगाकडून एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम ठेवीच्या स्वरुपात स्वीकारणार आहे. ठेवींच्या स्वरुपात ही रक्कम स्वीकारली जाणार आहे. तसेच पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफरही करता येणार आहेत. याशिवाय बँक इंटरनेट सेवा आणि इतर विशेष सुविधाही देण्यात येणार आहेत. ही बँक २५००० रुपयांच्या ठेवीवर ४.५ टक्के, तर २५ ते ५० हजार रुपयांच्या ठेवीवर पाच टक्के आणि ५० ते १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीवर ५.५ टक्के व्याजदर देणार आहे.