भारतीय अधिकारी स्वीस बँक खात्यांचा पाठपुरावा करणार असून त्यात अनेकांची नावे आहेत. दरम्यान, माजी काँग्रेस मंत्री परिणीत कौर व त्यांचा मुलगा रणिंदर सिंग यांच्या खात्यांबाबतची माहिती भारताने मागवली असल्याची माहिती स्वित्र्झलडने दिली आहे.
स्वित्र्झलडच्या करविषयक बाबीत मदत करण्याच्या निकषानुसार भारताने परिणीत कौर व त्यांच्या मुलाच्या खात्यांची माहिती मागवली असून कौर व सिंग हे दोघेही दहा दिवसात भारत सरकारच्या विनंतीवर अपील करू शकतात. संघराज्य कर प्रशासन व्यवस्थेअंतर्गत ज्यांच्या खात्यांची माहिती मागवली जाते त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. स्वित्र्झलडच्या गॅझेटमध्ये दोन अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यानुसार त्यात या दोघांची माहिती असून नागरिकत्व व जन्मतारीख एवढाच तपशील दिला आहे. इतर सविस्तर माहिती दिलेली नाही. कौर व त्यांच्या मुलाची या बातमीबाबत कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. यापूर्वी परिणीत कौर यांचे नाव एचएसबीसीच्या यादीत आले होते तेव्हा त्यांनी परदेशी बँकेत खाते असल्याचा इन्कार केला होता व कर अधिकाऱ्यांनी त्यांचे जबाब घेतले होते; त्यात त्यांना परदेशात खाते नसल्याचे सांगितले होते. अनेक भारतीय नागरिक व परदेशी नागरिक यांची नावे अलिकडच्या महिन्यात स्वित्र्झलडच्या गॅझेटमध्ये आली आहेत कारण स्वित्र्झलडवर काळा पैसा जाहीर करण्यासाठी जगातून दबाव येत आहे.