नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी देशातील जनतेला इशारा दिला आहे. नोटाबंदीचा निर्णय सर्वात त्रासदायक आणि तापदायक असून, नोटाबंदीमुळे आगामी काळात देशावरील संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहायला हवे, असेही त्यांनी म्हटले आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात उद्भवलेल्या परिस्थितीबाबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यापूर्वी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले होते. यावेळी त्यांनी ‘द हिंदू’मध्ये लिहलेल्या लेखातून नोटाबंदीचा निर्णय सर्वाधिक त्रासदायक असल्याचे म्हटले आहे. तसेच आगामी काळातील संभाव्य परिस्थितीशी सामना करण्यास सज्ज राहावे, असा इशारा देशवासियांना दिला आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे प्रामाणिक भारतीयांना मोठा त्रास होईल. पण दुसरीकडे काळा पैसा असणाऱ्यांचे मोठे नुकसान होणार नाही, असेही त्यांनी या लेखात म्हटले आहे. केंद्र सरकारने नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा घाईघाईत घेतले असून, त्यामुळे सर्वसामान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

ज्या लोकांनी आपले स्वतःचे पैसै आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी सरकारवर विश्वास ठेवला होता, त्याच कोट्यवधी भारतीयांचा विश्वास आणि आत्मविश्वासावर मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेऊन मोठा आघात केला आहे, असेही मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. १९९१ मध्ये देशात झालेल्या आर्थिक सुधारणांवेळी अर्थमंत्री असलेले मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीच्या निर्णयामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या असलेल्या निर्धाराचीही स्तुती केली. बोगस नोटांचा उद्योग, काळा पैसा आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला असेल तर, तो कौतुकास्पद आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी कोणतीही कृती आणि त्यामागील हेतू किंवा निर्धार याबाबत असलेल्या म्हणीचाही उल्लेख केला. निश्चयानुसार तुम्ही काम केले पाहिजे, अन्यथा अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे सांगून देश आणि देशवासियांना सावध राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.

प्रत्येक रोकड काळा पैसा असू शकत नाही आणि सगळा काळा पैसा रोख स्वरुपात जमा करू शकत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. भारतातील ९० टक्के कामगारवर्ग हा रोख स्वरुपातच मोबदला घेतो. त्यात शेकडोंच्या संख्येने शेतीसंबंधीत कामगार, बांधकाम क्षेत्रातील कामगारांचा समावेश आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. नोटाबंदीच्या या निर्णयामुळे देशाचा आर्थिक विकास दर आणि नोकऱ्यांवरही मोठा परिणाम होईल. त्यामुळे आगामी काळातील संभाव्य संकट लक्षात घेता आपण स्वतः त्याचा सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.