देशाचे सार्वभौमत्व अखंड ठेवण्यासाठी कितीही मोठी किंमत मोजायला तयार आहोत, अशा शब्दांमध्ये चीनने पुन्हा एकदा भारताला इशारा दिला आहे. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीला सुरुवात होण्याच्या पार्श्वभूमीवर चिनी संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून भारताला थेट इशारा देण्यात आला आहे. ‘भारताने भ्रमात राहून कोणतीही गोष्ट नशिबाच्या भरवशावर सोडू नये,’ असा फुकटचा सल्लादेखील चीनकडून देण्यात आला आहे. ‘भारताने डोक्लाममधील सैन्य मागे घ्यावे, अन्यथा आम्ही सीमेवरील सैन्य वाढू,’ असेदेखील चीनने म्हटले आहे.

‘चीन स्वत:च्या सुरक्षेसाठी कितीही मोठी किंमत मोजायला तयार आहे. देशाच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत,’ असे चिनी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वु क्यान यांनी म्हटले आहे. यंदाच्या आठवड्यात ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लादारांची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लादार अजित डोवाल उपस्थित राहणार आहेत. या बैठकीच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. मात्र चीनने पुन्हा एकदा आक्रमक भाषेचा वापर करत भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

भारत, चीन आणि भूतानच्या सीमेवरील डोक्लाम या वादग्रस्त भागात चिनी लष्कराकडून रस्त्याची निर्मिती केली जाते आहे. चिनी लष्कराच्या या रस्ते निर्मितीला भारताने विरोध केला आहे. ‘भारताने डोक्लाममधील सैन्य मागे घेऊन आपली चूक सुधारावी’, असे चिनी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वु क्यान यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले. ‘चिनी लष्कराने पावले उचलली असून सैन्याचा युद्धाभ्यास सुरुच राहिल,’ असेही त्यांनी म्हटले. ‘भारताने चूक सुधारण्यासाठी योग्य पावले उचलावीत आणि परिस्थिती चिघळवणाऱ्या कारवाया बंद कराव्यात,’ असा सल्लादेखील क्यान यांनी दिला.

चीनकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यावर भारताने अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. संवादाच्या माध्यमातून डोक्लाममधील परिस्थिती आटोक्यात आटोक्यात भारताचा प्रयत्न आहे. मात्र चीनकडून अद्याप तरी संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाही.  ‘जोपर्यंत चीन डोक्लाममधून माघारी हटणार नाही, तोपर्यंत भारतीय सैन्यदेखील डोक्लाम सोडणार नाही,’ असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत बोलताना सांगितले आहे.