मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हफीज सईद याच्यावर कोणताही गुन्हा नसल्याने त्याला देशात कोठेही फिरण्याची मुभा आहे, या पाकिस्तानच्या वक्तव्यावर भारताने जोरदार हल्ला चढविला आहे. जमात-ऊद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असलेल्या सईद याला जेरबंद करून पाकिस्तानने न्याय द्यावा, असे भारताने म्हटले आहे.
सईदबद्दलची भारताची भूमिका स्पष्ट आहे, तो मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आहे. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने भारताने केली आहे.  
मुंबईवरील हल्ल्याप्रकरणी त्याला कधीही अटक करण्यात आली नाही, तो पाकिस्तानी नागरिक असल्यानेच मुक्तपणे फिरत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटले आहे. मुंबईवरील हल्ल्यात सईदचा हात असल्याचे पुरेसे पुरावे मिळालेले नाहीत, या पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल विचारले असता प्रवक्ते म्हणाले की, पाकिस्तानात याबाबतचे ९९ टक्के पुरावे आहेत. कारण हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचण्यात आला आहे.