केसगळतीवर भारतीयांनी पारंपरिक ज्ञानाच्या आधारे  हळद, पाइन बार्क (देवदार वृक्षाचे खोड) व ग्रीन टी यांच्या मिश्रणापासून तयार केलेल्या औषधाचे पेटंट घेण्याचा ब्रिटनच्या एका प्रयोगशाळेचा प्रयत्न भारताने हाणून पाडला आहे, या आधी अमेरिकेतील कोलगेट -पामोलिव्ह या कंपनीने वनौषधींपासून भारताने तयार केलेल्या माउथवॉशचे पेटंट घेण्याचा प्रयत्न केला होता, तोही हाणून पाडण्यात आला आहे.
ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी (टीकेडीएल) या सीएसआयआरच्या संस्थेने देखरेख करून हा पेटंट घेण्याचा प्रयत्न हाणून पडला व भारतीय उत्पादनांचे संरक्षण केले आहे. सीएसआयआर म्हणजे भारतीय वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेने युरोपच्या पेटंट कार्यालयाकडे काही कागदपत्रे सादर केली, त्यात हळद, पाइन बार्क व ग्रीन टी यांचा वापर केसगळतीवर पारंपरिक औषध म्हणून आयुर्वेद व उनानी उपचारपद्धतीत प्राचीन काळापासून केला जात होता. केसगळतीवरच्या या भारतीय औषधाचे पेटंट घेण्याचा प्रयत्न पॅनगिया लॅबोरेटरीज या प्रयोगशाळेने केला. त्यांनी फेब्रुवारी २०११ मध्ये या औषधाच्या पेटंटसाठी अर्ज केला होता नंतर सीएसआयआर व टीकेडीएल यांनी त्याला आक्षेप घेतला व १३ जानेवारी २०१४ रोजी पुरावे सादर केले. तोपर्यंत युरोपीय पेटंट कार्यालयाने त्या कंपनीचा पेटंट अर्ज संकेतस्थळावर प्रसिद्ध केला होता. भारताच्या पुराव्यानुसार पेटंट अर्ज त्या कंपनीला या वर्षी २९ जूनला मागे घ्यावा लागला आहे. कोलगेट पामोलिव्हनेही भारताच्या जायफळाच्या अर्कावर आधारित माऊथवॉशचे निर्मिती सूत्र चोरून त्यावर पेटंट घेण्याचा प्रयत्न केला पण त्यातही ‘द ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी’ व सीएसआयआर यांनी त्या कंपनीला मात दिली व पेटंट अर्ज मागे घ्यायला लावला. सीएसआयआरच्या वरिष्ठ वैज्ञानिक अर्चना शर्मा यांनी प्राचीन पुस्तकात जायफळापासून माऊथवॉश कसे तयार करतात याची जी माहिती दिली होती ती पुरावा म्हणून सादर केली. मायरिस्टिका फ्रॅग्रन्स या वनौषधीचा उपयोग भारतात रोगोपचारावर कसा केला जातो हे पटवून देण्यात आले.
भारताचे पारंपरिक ज्ञान चोरून पेटंट घेण्याचा विदेशी कंपन्यांचा प्रयत्न टीकेडीएल व सीएसआयआर यांनी जागरूकतेने हाणून पाडला आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर योग, आयुर्वेद, उनानी, निसर्गोपचार या पूरक उपचारपद्धतींवर जास्त भर देण्यात आला आहे. त्यामुळे जैविक तस्करी रोखण्यासाठी सर्व संबंधित संस्था आता सज्ज आहेत. भारताचे पारंपरिक
ज्ञान चोरून त्यावर पेटंट घेण्याचे
दोन प्रयत्न या संस्थांनी हाणून पाडले ही कौतुकास्पद बाब आहे. आयुर्वेद, उनानी, सिद्धा, योग यांचे  एकूण २५ हजार उपगट आहेत.

देवदार वृक्षाच्या खोडाचा अर्क
देवदार वृक्षाच्या खोडाचा अर्क हा अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतो. त्या बरोबर काही जीवनसत्त्वे व अमायनो अ‍ॅसिडसही वापरली जातात. ज्या बुरशीमुळे केस गळती होते ती या अर्काने मारली जाते. या अर्काचा उपयोग मधुमेह, रक्तदाब, अ‍ॅलर्जी, कर्करोग यावरही चांगल्या प्रकारे होत असल्याचे आतापर्यंत तीनशे अभ्यासात निष्पन्न झाले आहे.