भारत आणि ताजिकिस्तान हे दोन्ही देश दहशतवादी समस्येच्या विळख्यात सापडले असल्यामुळे त्यांनी त्याविरोधात लढा तीव्र देण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे केले. पंतप्रधानांच्या वक्तव्याला पाकिस्तान व अफगाणिस्तानचा अप्रत्यक्ष संदर्भ होता. दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी अधिक सहकार्य करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी व्यक्त केला.
नरेंद्र मोदी आणि ताजिकिस्तानचे अध्यक्ष एमोमाली रेहमॉन यांच्यात सोमवारी विचारविनिमय झाला. ताजिकिस्तानच्या विकासासाठी हातभार लावण्यासाठी भारत बांधील आहे, असे मोदी यांनी सांगितले. याचाच भाग म्हणून दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य वाढविण्यावर या वेळी भर देण्यात आला. याखेरीज, भारत आणि ताजिकिस्तान यांच्यात व्यापार उदीम तसेच गुंतवणूकवृद्धी करण्याचेही मोदी यांनी मान्य केले.
कला आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात दोन्ही देशांनी सहकार्य करण्याच्या करारावर मोदी आणि रेहमॉन यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
नंतर मोदी आणि रेहमॉन यांच्यात संयुक्त पत्रकार परिषद झाली. दहशतवादाचा धोका दोन्ही देशांना असल्याकडे मोदी यांनी लक्ष वेधले. मोदी यांनी पाकिस्तान वा अफगाणिस्तानचा थेट नामोल्लेख केला नाही, परंतु त्यांचा रोख याच देशांच्या दिशेने स्पष्ट होता.