दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या शक्तींशी व्यापक लढा देण्याचा निर्धार व्यक्त करतानाच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी इजिप्तशी सुरक्षाविषयक करार अधिकाधिक दृढ करण्याचे भारताने ठरविले असल्याचेही स्पष्ट केले.
विचारवंत आणि लोकप्रतिनिधींच्या समूहासमोर भाषण करताना सुषमा स्वराज यांनी आखातातील इसिस आणि पाकिस्तानातील तालिबान आणि लष्कर-ए-तोयबाकडून असलेल्या धोक्यांचा उल्लेख केला.
सध्या वाढता हिंसाचार आणि असहिष्णुता याला आपण सामोरे जात आहोत. अल-कायदा, इसिस, तालिबान, लष्कर-ए- तोयबा यांच्या वाढत्या दहशतवादाची झळ संबंधित प्रांतांना सोसावी लागत आहे. त्यामुळे आपल्याला त्याविरुद्ध लढा दिलाच पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
दहशतवादी शक्तींनी सामूहिकपणे आणि व्यापकपणे जगाला आव्हान दिले आहे. अशा प्रकारच्या हल्ल्यांचा भारत केवळ निषेधच करीत नाही तर  दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारत इजिप्तसमवेत हातमिळवणी करीत आहे, असेही स्वराज म्हणाल्या.
दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी दोन्ही देशांमधील समन्वय अधिक वाढविण्याचेही या वेळी स्वराज यांनी प्रस्तावित केले.
सहा भारतीय खलाशांच्या सुटकेची भारताची मागणी
इजिप्तमध्ये फेब्रुवारी २०१४ मध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या सहा भारतीय खलाशांची लवकर सुटका होण्यासाठी इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे.इजिप्तचे परराष्ट्रमंत्री समेह हसन शौकरी यांनी भारतातील सहा खलाशांच्या सुटकेसाठी हस्तक्षेप करावा, अशी विनंती स्वराज यांनी केली आहे. मात्र अटक करण्यात आलेल्या खलाशांबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली नाही.