शस्त्रसंधीचा भंग करून पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात ११ नागरिक जखमी झाल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे संतप्त झाले असून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर त्यांनी टीकेची तोफ डागली आहे. पाकिस्तानी सैन्याने अशा प्रकारे यापुढे बेछूट गोळीबार केल्यास त्याला तसेच चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश केंद्र सरकारने सीमा सुरक्षा दलास दिले आहेत.
जम्मू आणि संबा जिल्ह्य़ातील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैन्याने परत एकदा शस्त्रसंधीचा भंग करून केलेल्या गोळीबारात तीन नागरिक जखमी झाले. काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी सकाळी जीएमसी रुग्णालयात जाऊन जखमी व्यक्तींची भेट घेतली. शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन होत असताना भारतासमवेत मित्रत्वाची तसेच संवादाची भाषा करून काय फायदा आहे, असा सवाल त्यांनी केला. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या संमतीशिवाय शस्त्रसंधीचे उल्लंघन होऊच शकत नाही, असेही ओमर यांनी सुनावले. शरीफ यांनी इच्छाशक्ती गमावली असून त्यांच्या लष्करावर त्यांचे नियंत्रण तरी नसावे. त्यामुळे अशा परिस्थितीत पाकिस्तानी नेतृत्वासमवेत मैत्री आणि वाटाघाटींची चर्चा करून काय उपयोग आहे, असाही सवाल ओमर अब्दुल्ला यांनी उपस्थित केला. नवाझ शरीफ यांनी भारतासमवेत शांततेच्या मैलाचा टप्पा ओलांडायचा असेल तर त्यांनी शस्त्रसंधीचा भंग करणे प्रथम थांबविले पाहिजे, असे ओमर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, यापुढे पाकिस्तानने अशा प्रकारे कुरापत काढून गोळीबार सुरू केला तर त्यास तसेच चोख प्रत्युत्तर द्यावे, अशा सूचना सीमा सुरक्षा दलास देण्यात आल्याचे दिल्लीतील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.