भूकंपग्रस्त नेपाळमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना त्वरेने बाहेर काढण्यासाठी विदेशी नागरिकांना सदिच्छा व्हिसा देणे आणि त्यांच्यासाठी बसगाडय़ा व रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, यासारखी पावले भारताने रविवारी उचलली.

गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यात आले. मदत व बचावकार्याचा आढावा घेतल्यानंतर, एनडीआरएफचे ३०० जादा कर्मचारी स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी नेपाळला पाठवले जावेत, असे निर्देश सिंह यांनी दिले. एनडीआरएफचे सुमारे ४६० कर्मचारी शनिवारीच नेपाळला पाठवण्यात आले होते.

नेपाळमध्ये अडकलेल्या सर्व पर्यटकांना लवकरात लवकर तेथून बाहेर निघता यावे यासाठी त्यांना सदिच्छा व्हिसा देण्याचे निर्देश ‘ब्यूरो ऑफ इमिग्रेशन’ ला देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, आंतरराष्ट्रीय सीमा पार करणाऱ्या पर्यटकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी, भारत व नेपाळच्या सीमेवर देखरेख करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाला सीमेवर शिबिरे उभारण्यास सांगण्यात आले आहे. राजनाथ सिंह यांनी बिहार व उत्तर प्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री अनुक्रमे नितीश कुमार आणि अखिलेश प्रसाद यादव यांना दूरध्वनी केला व त्यांना नेपाळमध्ये अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी बसगाडय़ा व रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास सांगितले.
दरम्यान, पर्यटनासाठी नेपाळला गेलेले २४ नागपूरकर बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाला कळविले आहे.

भारतीय मदत पथके आणि भूकंपग्रस्त नेपाळमधील स्थानिक अधिकारी यांच्यात मदतकार्याचा समन्वय साधण्याच्या उद्देशाने ‘नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स’ (एनडीआरएफ)चे प्रमुख ओ. पी. सिंग हे  नेपाळला पोहोचले. यापूर्वीच काठमांडूत पोहोचलेल्या दलाच्या सात चमूंच्या कामावर ते देखरेख करतील. प्रत्येक चमूत सुमारे ४५ सदस्य आहेत. हे चमू काठमांडूपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या ललितपूर, भगतपूर आणि खोरे भागात तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफचे आणखी ३ चमू रविवारी सायंकाळी नेपाळला पोहोचले. आमच्या मोहिमेला वेग यावा यासाठी नेपाळमध्ये कमांड नियंत्रण कक्ष स्थापन करण्याकरिता मी नेपाळच्या अधिकाऱ्यांची भेट घेईन, असे सिंग यांनी सांगितले.

भारतीय वायुसेनेने भूकंपग्रस्त नेपाळमध्ये अडकलेल्या  ५५० भारतीयांना आतापर्यंत हलवले आहे. १० विमाने आणि १२ हेलिकॉप्टर्सच्या मदतीने वायुसेनेने आज तज्ज्ञ आणि आवश्यक उपकरणे काठमांडूला पोहचवली.
*****
शनिवारी रात्री पावणेअकरा वाजेपासून वायुसेनेची ४ विमाने नेपाळहून ५४६ भारतीयांना घेऊन येथे पोहचली आहेत. सगळ्यात आधी ५५ प्रवाशांना घेऊन एक सी-१३० जे विमान दिल्लीत पोहचले. या प्रवाशांमध्ये ४ लहान बालकांचाही समावेश होता.
*****
मध्यरात्री १०२ प्रवाशांना घेऊन एक सी-१७ आणि त्यानंतर १५२ लोकांसह आयएल ७६ विमान नेपाळहून आले. पहाटे ४ वाजता पोहचलेल्या सी-१७ विमानातून २३७ प्रवासी भारतात परत आले.
*****
रविवारी लष्कराच्या फील्ड इंजिनीयरिंग कंपन्या व रेजिमेंट यांच्यासह उपकरणे घेऊन १० मोठी विमाने नेपाळला पाठवली गेली. ही मोहीम दिवसभर सुरू होती, असे वायुसेना प्रमुख अरूप राहा यांनी सांगितले.