अमेरिकी प्रशासनाच्या पाकिस्तानला एफ-१६ ही लढाऊ विमाने विकण्याच्या निर्णयाचा भारताकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. अमेरिकेतील लॉकहीड मार्टीन या कंपनीने पाकिस्तानबरोर केलेल्या या व्यवहाराला ओबामा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. अमेरिकेच्या या निर्णयाबद्दल दिल्लीतील अमेरिकी राजदूतांकडे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.


अमेरिकन सरकारकडून शुक्रवारी पाकिस्तानला आठ एफ-१६ विमाने विकण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तब्बल ७०० मिलियन डॉलर्सच्या या करारानुसार अमेरिका पाकिस्तानला, एफ-१६ विमाने, रडार, अन्य सामुग्री आणि त्यासंदर्भातील प्रशिक्षणही देणार आहे. या विमानांमुळे पाकिस्तानी हवाई दलाची क्षमता वाढेल आणि देशातील दहशतवादाला आळा घालण्यास मदत होईल, असा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे.