भारत असहिष्णू आहे ही समस्या नाही. विरोधाभास हा आहे की, भारत असहिष्णुतेबाबतही खूप सहिष्णू आहे, असे विधान नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी केले. ते दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या राजेंद्र माथूर वार्षिक व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. देशातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात बोलताना खडे बोल सुनावले. भारतामधील बहुतांश लोक ज्यांना हिंदू म्हणून घ्यायला आवडते त्यांना अन्यधर्मीयांबद्दल कोणताही आक्षेप नाही. भारताकडे असणारी पारंपरिक सहिष्णुता आणि विविधता ही कारणे देशवासियांना अभिमान बाळगण्यासाठी पुरेसी आहेत. मात्र, ती जपण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मी भारतावर नाही तर भारत सरकारच्या कारभारावर नाराज आहे. नागरिकांनी असहिष्णुता सहन करता कमा नये. या देशातले लोक कधीच असहिष्णू नव्हते. फक्त आपल्या राजकीय फायद्यासाठी एक विशिष्ट गट असहिष्णुता पसरवत आहे, असे अमर्त्य सेन यांनी म्हटले.
ज्यावेळी अल्पसंख्यकांवर हल्ले होतात, तेव्हा अशाप्रकारच्या घटनांच्या विरोधात देश आणि सरकारचे समर्थन मिळत नाही. मात्र हे या सरकारपासून नव्हे, तर मागील सरकारच्या काळातही अल्पसंख्यांक सुरक्षित नव्हते. एम.एफ हुसेन, सलमान रश्दी ही त्याची उदाहरणे आहेत. सध्याच्या सरकारमध्ये बंदीच्या घटना अधिक वाढल्या आहेत. आपण असहिष्णुतेबाबतीत खूपच सहिष्णू आहोत. हे थांबवायला हवे, असे सेन यांनी सांगितले.