भारताच्यादृष्टीने नामुष्कीच्या ठरलेल्या दोन घटनांवेळी गुप्तहेर संस्थेचे प्रमुख असणारे ए. एस. दुलत यांनी नुकत्याच प्रकाशित आपल्या पुस्तकातून तत्कालीन राजकीय घडामोडींविषयी काही गौप्यस्फोट केले आहेत. १९९९ मध्ये कंदहार विमान अपहरणावेळी कमांडो पथकांकडून अचानक हल्ला करून प्रवाशांची सुटका करण्याचा भारतीय सुरक्षा संस्थांचा मनसुबा होता. मात्र, त्यावेळी दुबईतील स्थानिक प्रशासनाने साथ न दिल्यामुळे भारताचा प्रयत्न फसल्याचे दुलई यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे. त्यावेळी भारताने अमेरिकेकरवी दुबईवर मदतीसाठी दबाव आणण्याचा प्रयत्नदेखील केला होता. मात्र, त्यावेळची परिस्थिती भारतासाठी प्रतिकूलच होती, असे दुलत यांनी पुस्तकात म्हटले आहे. विमान अमृतसरमध्ये उतरले तेव्हा केंद्र व पंजाब सरकार कोणताही निर्णय घेऊ शकले नाही व आपण अपहरणकर्त्यांवर नियंत्रण मिळवण्याची एक संधी गमावली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
१९८९ मध्ये मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया हिच्या सुटकेसाठी भारताला पाच दहशतवाद्यांची सुटका करावी लागली होती. तर १९९९च्या डिसेंबर महिन्यात दहशतवाद्यांकडून भारताच्या आयसी-८१४ या विमानाचे अपहरण करण्यात आल्यानंतर प्रवाशांच्या सुटकेसाठी वाजपेयी सरकारला मसुद अझर, ओमर शेख आणि मुश्ताक अहमद झरगर या दहशतवाद्यांना सोडावे लागले होते. या दोन्ही घटनांपैकी १९८९ मध्ये दुलत इंटेलिजन्स ब्युरोच्या श्रीनगरमधील विभागाचे प्रमुख होते. तर कंदहार विमान अपहरणावेळी दुलत ‘रॉ’च्या प्रमुखपदी होते. या दोन्ही प्रसंगांमध्ये आलेले अनुभव दुलत यांनी आपल्या ‘काश्मीर- द वाजपेयी इयर्स’ या पुस्तकातून सांगितले आहेत. कंदहार विमान अपहरण प्रकरणात पाकिस्तानी लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ यांचा हात असल्याचेही दुलत यांनी पुस्तकात म्हटले आहे. कारण, आयएसआयच्या पाठिंब्याशिवाय अशा प्रकारच्या दहशतवादी मोहिमा पार पाडणे अशक्य असल्याचे मत दुलत यांनी व्यक्त केले. कंदहार अपहरण प्रकरणात पाच दहशतवाद्यांची सुटका करण्याचा निर्णय झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला चांगलेच संतापले होते, रागाच्या भरात ते राजीनामाही द्यायला तयार होते, त्यांनी तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांना दूरध्वनी करुन आपला निषेध नोंदविल्याची आठवण दुलत यांनी सांगितली.