दहशतवादाविरुद्ध विश्वासार्ह आणि खणखणीत प्रत्युत्तर देणारी यंत्रणा भारत उभारत असून पाकिस्तानने भारताला गृहित धरू नये, असा इशारा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी आज दिला. त्याच वेळी भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे सर्व प्रश्न चर्चेद्वारे सुटू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘द म्युनिच सिक्युरिटी कॉन्फरन्स’मध्ये भाषण करताना राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अनेक मुद्दय़ांवर डोवल यांनी भाष्य केले. भारताला चीनबरोबर मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. मात्र त्यासाठी भौगोलिक सार्वभौमतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानने गेल्या काही दिवसांत संयुक्त राष्ट्रांसह अनेक व्यासपीठांवर काश्मीर मुद्दय़ाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्याचबरोबर नियंत्रण रेषेवर तसेच सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघनही केले जात आहे. या पाश्र्वभूमीवर डोवल यांचा हा इशारा महत्त्वपूर्ण आहे.
दहशतवादाच्या पाकिस्तानमधील उगमासंदर्भात ते म्हणाले, दहशतवादाला प्रतिबंध करण्यासाठी विश्वासार्ह आणि आम्हाला यापुढे गृहीत धरता येणार नाही हे जगाला कळेल अशा प्रकारची मजबूत यंत्रणा उभी करण्याच्या प्रयत्नात आहे. यातून दक्षिण आशियात स्थैर्य प्रस्थापित होण्यास मदत होईल.
सर्व शेजारी देशांशी चांगले संबंध ठेवण्याची भारताची इच्छा आहे. भारताची आर्थिक प्रगती झाल्यास सर्व शेजारी देशांना त्याचा लाभ होईल आणि हे सर्व देश एकत्र येतील, भारताच्या आर्थिक भरभराटीमुळे या देशांनाही अधिक संधी उपलब्ध होतील, असे डोवल म्हणाले.