भारतीय संरक्षण बाजारपेठेत आघाडीवर असलेली काही परदेशी आस्थापने चौकशी संस्थांच्या नजरेखाली असून त्यांचा संबंध करचुकवेगिरीच्या प्रकरणातील संरक्षण सल्लागार संजय भंडारी याच्याशी आहे. सूत्रांनी सांगितले की, भंडारी याने केलेल्या फोनची माहिती प्राप्तिकर खात्याने घेतली असून त्यात विविध परदेशी आस्थापनांचे क्रमांक आढळले आहेत. भंडारी याने विविध परदेशी संस्थांना कंत्राटे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. परदेशी व देशी कंपन्यांनी असा दावा केला आहे की, आम्ही त्यांच्या संपर्कात होतो यापलीकडे काही नाही. पण चौकशी संस्थांच्या मते त्यात त्यापलीकडेही बरेच काही आहे. भंडारी याच्यावरील छाप्यात प्राप्तिकर खात्याला संरक्षण खात्याची काही कागदपत्रे मिळाली असून त्यात हवेतच इंधन भरण्याच्या यंत्रणांचा समावेश होता. एअरबस यात मोठी भागीदार होती. त्यांनी पीटीआयच्या इमेल्सना उत्तरे दिली नाहीत, भंडारी यांच्या संपर्कात एअरबस कंपनी होती का, असे विचारण्यात आले होते. फ्रान्सची थेल्स या प्रमुख संरक्षण कंपनीचे कर्मचारी भंडारी याच्या संपर्कात होते असे समजते. थेल्स कंपनीने म्हटले आहे की, भारतात काही चौकशी चालू आहे एवढेच आम्हाला माहिती आहे. आम्ही त्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही.