येत्या काही महिन्यांमध्ये जगभरातील मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. भारतही याला अपवाद नसून त्यामुळे या क्षेत्रात भारत अमेरिकेला मागे टाकणार आहे. २०१८ मध्ये भारतातील मोबाईल वापकर्त्यांची संख्या तब्बल ५३ कोटींपर्यंत पोहोचेल, असा अंदाज अमेरिकास्थित झेनिथ या एजन्सीने व्यक्त केला आहे. या यादीत चीन भारतापेक्षा पुढे आहे. २०१८ मध्येही चीन आघाडी कायम राखेल आणि तेथील मोबाईल वापरकर्त्यांची संख्या १.३ अब्ज असेल, असा अंदाज झेनिथने वर्तवला आहे. यामध्ये अमेरिका २९ कोटी मोबाईल वापरकर्त्यांसह तिसऱ्या क्रमांकावर असेल.

पुढील वर्षभरात जगातील मोबाईल वापरकर्त्यांची संख्या वेगाने वाढणार असल्याचे ‘झेनिथ’ने म्हटले. ‘२०१८ मध्ये जगभरातील ५२ देशांमधील मोबाईल वापरकर्त्यांची संख्या ६६ टक्क्यांहून जास्त असेल. सध्या हे प्रमाण ६३ टक्के आहे,’ असे झेनिथने अहवालात म्हटले आहे. ‘दैनंदिन जीवनातील स्मार्टफोनचा वापर सातत्याने वाढतो आहे. यामुळे इंटरनेटचा वापरदेखील वाढला आहे,’ असे ब्रॉडकास्टिंगकेबल डॉट कॉमने वृत्तात म्हटले आहे.

मोबाईलवरुन होणारा इंटरनेटचा वापर अतिशय वेगाने वाढत आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये इंटरनेटवरील जाहिरातींसाठी केला जाणाऱ्या एकूण खर्चापैकीची ५९ टक्के रक्कम मोबाईल इंटरनेटकडे वळवली जाईल, असा अंदाजही अमेरिकन एजन्सीने वर्तवला आहे. २०१८ मध्ये इंटरनेटवरील जाहिरातींसाठी केला जाणाऱ्या एकूण खर्चापैकीची ५९ टक्के रक्कम मोबाईल इंटरनेटसाठी खर्च केली जाईल. तर २०१९ मध्ये हे प्रमाण ६२ टक्क्यांवर जाईल, असेही एजन्सीने अहवालात म्हटले आहे.

‘२०१८ मध्ये इंटरनेटचा वापर वाढेल. त्यातही मोबाईलवरुन इंटरनेट वापरणाऱ्यांचे प्रमाणदेखील वेगाने वाढेल. २०१८ मध्ये लोकांनी मोबाईल इंटरनेटवर घालवलेला वेळ एकूण इंटरनेटवरील वेळाच्या तब्बल ७३ टक्के इतका असेल. सध्या हे प्रमाण ७० टक्के इतके आहे. तर २०१९ मध्ये हेच प्रमाण ७६ टक्क्यांवर जाईल,’ असे एजन्सीने अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोबाईलसोबतच टॅबलेट वापरकर्त्यांची संख्यादेखील वाढल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी टॅबलेट वापरकर्त्यांची संख्या १७.८ टक्के इतकी होती. यंदा ते प्रमाण १८.७ टक्क्यांवर पोहोचले आहे.