पाकिस्तानचा कांगावा, दस्तऐवज तयार करण्याची सिनेटची सरकारला सूचना

पाकिस्तानात भारताकडून हस्तक्षेप होत असल्याबद्दलचा सर्व दस्तऐवज तयार करून तो अन्य देशांना आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना पाठवावा, अशा आशयाचा ठराव पाकिस्तानच्या सिनेटने सर्वानुमते मंजूर केला.

पाकिस्तानातील सत्तारूढ पीएमएल-एनचे सिनेट सदस्य लेफ्ट. जन. (निवृत्त) अब्दुल कय्यूम यांनी मांडलेला हा ठराव सोमवारी मंजूर करण्यात आला.

पाकिस्तानच्या अंतर्गत व्यवहारात ढवळाढवळ करून भारत अस्थिरता आणि दहशतवादाला चिथावणी देत असल्याचा अहवाल तयार करावा, असे ठरावात म्हटल्याचे ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने म्हटले आहे. त्याचप्रमाणे सदर अहवाल महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था आणि देशांना पाठवावा, असेही अहवालात म्हटले आहे.

बलुचिस्तान प्रांतात ३ मार्च रोजी एका भारतीय हेराला पकडल्याचा दावा पाकिस्तानने केल्यानंतर जवळपास अडीच महिन्यांनी सिनेटमध्ये हा ठराव करण्यात आला आहे. भारतीय हेर कुलभूषण जाधव हा इराणमधून पाकिस्तानात आल्याचा दावा पाकिस्तानने केला. त्याला अटक करण्यात आल्याचे पुरावे पाकिस्तानने अमेरिका आणि ब्रिटनला दिले, मात्र या देशांकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

पाकिस्तानने असे म्हटले होते की, अरब व आसियान देशांना जाधव यांनी भारताच्या कारवायांबाबत दिलेल्या कबुली जबाबाची कल्पना देण्यात आली होती. जाधव हे भारतीय नौदलाचे निवृत्त कर्मचारी असल्याची कबुली भारताने दिली होती पण त्यांचा सरकारशी काही संबंध असल्याचा इन्कार केला होता.

पाकिस्तान ‘सीपीईसी’ला पूर्ण संरक्षण देणार

बीजिंग- बलुचिस्तान प्रांतातून जाणाऱ्या ४६ अब्ज डॉलरच्या महत्त्वाकांक्षी चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका (सीपीईसी) प्रकल्पाला पूर्ण संरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन पाकिस्तानचे लष्करप्रमुख जन. राहील शरीफ यांनी चीनला दिले आहे. शरीफ हे दोन दिवसांच्या चीन भेटीवर आले असून, त्यांनी सोमवारी पंतप्रधान ली केकियांग आणि मध्यवर्ती लष्करी आयोगाचे उपाध्यक्ष फान चांगलाँग यांची भेट घेतली. ली केकियांग यांच्यासमवेत झालेल्या चर्चेच्या वेळी शरीफ यांनी, पाकिस्तान आणि चीन यांच्यातील मैत्रीची स्तुती केली, पाकिस्तानला सीपीईसीकडून अपेक्षा असून त्यासाठी प्रकल्पाला पूर्ण संरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन शरीफ यांनी दिले.