शोधमोहिमेवर देखरेखीसाठी र्पीकर चेन्नईत

भारतीय हवाई दलाचे एएन-३२ विमान अजूनही बेपत्ता असून त्यात लष्करी अधिकाऱ्यांसह २९ जण आहेत. काल हे विमान बंगालच्या उपसागरावरून जात असताना बेपत्ता झाले. शोधकार्यावर देखरेख करण्यासाठी संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर चेन्नईतील तांबरम हवाई तळावर पोहोचले आहेत.

संरक्षण सूत्रांनी सांगितले की, मदतकार्य वेगाने चालू असून विमानाचा तपास लागलेला नाही. संरक्षण दलाच्या सूत्रांनी सांगितले, अजून काहीच धागेदोरे मिळालेले नाहीत. हे भारतीय हवाई दलाचे मालवाहतूक विमान होते व त्यात २९ जण होते त्यात चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे विमान चेन्नईतील तांबरम हवाई तळावरून पोर्ट ब्लेअरकडे निघाले व २३ हजार फूट उंचीवर असताना त्यांचा संपर्क तुटला होता.

एएन-३२ विमानाने शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता तांबरम हवाई तळावरून उड्डाण केले होते व त्यानंतर सोळा मिनिटांतच त्याचा संपर्क तुटला होता. हे विमान पुन्हा इंधन न भरता चार तास चालू शकते.  हवाई दल, नौदल, तटरक्षक दल यांनी शोधकार्य चालवले असून त्यात एक पाणबुडी, आठ विमाने व १३ जहाजे यांचा समावेश आहे. बेपत्ता विमानात सहा कर्मचारी होते त्यात दोन वैमानिक व एका दिशादर्शक व्यक्तीचा समावेश होता. भारतीय हवाई दलाचे ११, लष्कराचे २ तर तटरक्षक दलाचा १ आणि नौदलाचे ९ जण त्या विमानात आहेत.

दोन आठवडय़ात तीनदा बिघाड

दी इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार एएन ३२ या विमानात दोन आठवडय़ात तीनदा बिघाड झाला होता. २ जुलैला त्याच्या थ्रॉटलमध्ये बिघाड झाला होता नंतर ७ जुलैला हायड्रॉलिक गळती झाली होती, १४ जुलैला प्रेशर लिकची समस्या होती. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये त्याची कानपूर येथील  बेस रिपेअर डेपोत दुरुस्ती करण्यात आली होती, त्यानंतर त्याने २७९ तासांचे उड्डाण पूर्ण केले होते.

रशियन बनावटीची ही विमाने १९८४ मध्ये भारतीय हवाई दलात सामील केली होती, यातील १०१ विमानांची  सुधारणा करण्याची मोहीम २०१० मध्ये सुरू झाली व नंतर २०११ ते २०१५ दरम्यान सुधारणा केलेली ४० विमाने कीवहून भारतात आली

होती. २००९ मध्ये अरुणाचल प्रदेशात याच प्रकारच्या विमानाला अपघात होऊन १३ जण मरण पावले होते. १९९९ मध्ये या विमानांच्या अपघातात दिल्ली येथे २१ जण मृत्युमुखी पडले होते.