बंगालच्या उपसागरात बेपत्ता झालेल्या भारतीय हवाईदलाच्या एएन-३२ विमानाची व्यापक शोधमोहीम चार दिवसांपासून सुरू असूनही, विमानाचे अवशेष किंवा प्रवासी यांचा अद्यापही थांगपत्ता न लागल्याने या विमानातील २९ लोक जिवंत सापडण्याची आशा मावळली आहे.

या विमानातील ‘इमर्जन्सी लोकेटर ट्रान्समीटर’ (ईएलटी) काम करत नसणे, ही चिंतेची बाब असून त्यामुळे शोधमोहीम आणखी कठीण बनली आहे. बेपत्ता विमान आणि त्यातील कर्मचारी यांचा शोध घेण्यात आम्हाला अद्याप यश आलेले नसून हे अतिशय दुर्दैवी आहे. हा आमच्यासाठी अत्यंत कठीण प्रसंग असून, विमनस्क झालेल्या कुटुंबीयांच्या काळजीत आम्ही सहभागी आहोत, असे वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल अरुप राहा नवी दिल्लीत म्हणाले.

हवाईदलाच्या ताफ्यातील शंभरहून अधिक एएन-३२ मालवाहू विमानांचे आयुष्य संपले असूनही ती अद्याप वापरली जात असल्याची टीका काही जण करत आहेत. मात्र गेल्या तीन दशकांमध्ये भारतीय हवाईदलाने सतत कार्यरत असणाऱ्या या विमानांच्या क्षमतांचा पूर्ण उपयोग करून घेतला आहे, असे सांगून राहा यांनी त्यांच्यावरील टीका अमान्य केली.

१९८४-१९९१ या कालावधीत हवाईदलात समाविष्ट करण्यात आलेल्या बेपत्ता एएन-३२ विमानाची गेल्या वर्षीच मोठी दुरुस्ती करण्यात आली होती. उत्कृष्ट कामगिरीमुळेच एएन-३२ हे मालवाहू विमान जगातील सर्वात उंचावर असलेल्या दौलत बेग ओल्डी हवाई तळावर उतरत असे. शिवाय ही विमाने चालवण्यासाठी सक्षम वैमानिकांचीच निवड केली जाते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असे राहा यांनी आवर्जून सांगितले.

अशा प्रकारच्या घटना म्हणजे आमच्या शूर कर्मचाऱ्यांना त्यांच्या दररोजच्या मोहिमांमध्ये तोंड द्याव्या लागणाऱ्या आव्हानांची दु:खद आठवण आहे, याचाही वायुदल प्रमुखांनी उल्लेख केला. ही दुर्दैवी घटना का घडली हे नेमके शोधून काढण्यासाठी सखोल चौकशी करण्यात येईल, असे राहा यांनी सांगितले.