भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील ‘सुखोई ३०’ हे युद्धविमान पुण्याजवळील थेऊर येथे कोसळल्याच्या ताज्या घटनेनंतर या जातीची सर्व विमाने न उडवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तांत्रिक फेरचाचणीत उत्तीर्ण झाल्यानंतरच या विमानांच्या उड्डाणाबाबत हिरवा कंदील देण्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
हवाई दलाच्या पुणे तळावरून १४ ऑक्टोबर रोजी उड्डाण करणारे ‘सुखोई ३०’ विमान पुणे जिल्ह्यातील थेऊर येथे एका गावापासून काही अंतरावर जमिनीवर उतरत असताना खाली कोसळले. या विमानाला कोणतीही सूचना दिली नसताना त्यातील वैमानिकांची आसने ‘इजेक्ट’ झाल्यानंतर ही दुर्घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गेल्या पाच वर्षांतील ‘सुखोई’ अपघाताची ही पाचवी घटना असल्याने याबाबत कठोर पावले उचलण्याचा निर्णय भारताने घेतला. हवाई दलाच्या ताफ्यातील २०० ‘सुखाई’ विमाने उडू न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ‘पुण्यातील दुर्घटनेसंदर्भात चौकशी सुरू आहे. विमानाच्या चाचण्याही सुरू आहेत. या चाचणीत विमान योग्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच त्यांच्या उड्डाणाबाबत निर्णय घेण्यात येईल,’ असे हवाई दलाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. यापूर्वीही दोनदा ‘सुखोई’च्या उड्डाणावर बंदी आणली गेली होती.