भारतीय हवाई दलाचे वैमानिक इस्रायलमध्ये जाऊन युद्धाभ्यास करणार आहेत. अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी यांच्यासह भारतीय वैमानिक संयुक्त युद्धाभ्यास करणार आहे. विशेष म्हणजे चीन आणि पाकिस्तानला या युद्धाभ्यासात स्थान देण्यात आलेले नाही. हा संयुक्त युद्धाभ्यास हवाई ड्रिल इतिहासातील सर्वात मोठा आणि जटिल संयुक्त युद्धाभ्यास मानला जातो आहे.

इस्रायलमध्ये करण्यात येणाऱ्या संयुक्त युद्धाभ्यासाची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही, असे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे. भारतीय हवाई दलाचे वैमानिक वर्षाच्या शेवटी ब्लू फ्लॅग एक्सरसाइजमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिल्याचे इकॉनॉमिक टाईम्सने म्हटले आहे. भारत पहिल्यांदाच इस्रायलमध्ये इतर देशांसह संयुक्त युद्धाभ्यास करणार आहे.

इस्रायल भारताला लष्करी साहित्य आणि हत्यारे पुरवणारा प्रमुख देश आहे. भारतासह सात देश या युद्धाभ्यासात सहभाग घेणार आहेत. जवळपास १०० लढाऊ विमानांचा या युद्धाभ्यासात सहभाग असणार आहे. यामध्ये भारताची कोणती विमाने सहभागी होणार आहेत, याची माहिती इकॉनॉमिक टाईम्सने दिलेली नाही. मात्र मानवरहित हॉरेन एरियल व्हेईकल यात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याआधी भारतीय हवाई दलाने अमेरिकेतील रेड फ्लॅग एक्सरसाइजमध्ये सहभागी घेतला होता. भारतीय सैन्याने मे २०१६ मध्ये अलास्कामध्ये संयुक्त युद्धाभ्यास केला होता. यामध्ये भारताची ४ सुखोई ३० एमकेआय, ४ जॅग्वार विमाने आणि दोन आयएल ७८ मिड एअर टँकर सहभागी झाले होते.

याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात भारताने इस्रायलकडून क्षेपणास्त्रांसाठी करार केला आहे. भारत आणि इस्रायल संयुक्तपण भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या (एमआर-एसएएम) क्षेपणास्त्राची निर्मिती करणार आहेत. यासाठी भारताने इस्रायलसोबत १७ हजार कोटींचा करार केला आहे. यामधून निर्माण केलेल्या आलेल्या क्षेपणास्त्रांचा वापर भारतीय लष्कराकडून केला जाणार आहे. भारताची सुरक्षा संशोधन आणि विकास संस्था आणि इस्रायलची एअरक्राफ्ट इंडस्ट्री क्षेपणास्त्राची निर्मिती करणार आहेत.