अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सहा मुस्लिम देशातील शरणार्थींवर लादण्यात आलेल्या निर्बंधांवर भारतीय वंशाच्या सिनेटर्सकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. अशी चूक करू नका, या निर्बंधांमुळे आपण सुरक्षित राहणार नाही. सध्या अमेरिकेत कट्टरतावाद फोफावत आहे. अशावेळी त्यावर उपाययोजना करण्याऐवजी मुस्लिम समाजाला वाळीत टाकून अमेरिकन लोकांचे आयुष्य धोक्यात आणले जात आहे. हा प्रशासकीय निर्णय अनैतिक आणि अमेरिकन मुल्यांशी सुसंगत नसल्याचे कॅलिफोर्नियाचे सिनेटर कमला हरी यांनी म्हटले. हाऊस रिप्रेझेंटेटिव्हजमधील अमी बेरा, राजा कृष्णमुर्ती , रो खन्ना आणि प्रमिला जयपाल या सहकाऱ्यांनीही कमला हरी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

ज्यांना अमेरिकेत येण्यासाठी अगोदरच व्हिसा जारी करण्यात आला आहे व ज्यांचे सध्या अमेरिकेत कायमस्वरुपी वास्तव्य आहे, अशांना ट्रम्प प्रशासनाकडून नव्या आदेशांनुसार अभय देण्यात आले आहे. तसेच दुहेरी नागरिकत्व असणाऱ्यांनाही या निर्बंधांतून वगळण्यात आले आहे, अशी माहिती प्रमिला जयपाल यांनी दिली. प्रमिला जयपाल या अमेरिकन सभागृहात निवडून जाणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सहा मुस्लिम देशातील शरणार्थींना अमेरिकेत प्रवेश करण्यास प्रतिबंध करणाऱ्या सुधारित अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे. या सुधारित अध्यादेशातून इराकला वगळण्यात आले आहे. पूर्वी या प्रतिबंधित देशांच्या यादीत इराकसह सात देशांचा समावेश होता. अमेरिकेचा संरक्षण विभाग आणि परराष्ट्र व्यवहार विभागाच्या दबावामुळे अमेरिकन प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती समजते. अमेरिका सध्या इराकमधील इस्लामिक स्टेटच्या विरोधात व्यापक मोहीम आखण्याच्या तयारीत आहे. त्या मोहीमेला अनुकुल वातावरण निर्माण व्हावे यासाठी इराकवरील ही बंदी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी सात मुस्लिम देशातून येणाऱ्या मुस्लिम शरणार्थींवर बंदी घातली होती. त्यांच्या या निर्णयाचे पडसाद जगात तसेच अमेरिकेतही उमटले होते. त्यानंतर अमेरिकेतील न्यायालयानेही त्यांच्या या निर्णयाला विरोध केला होता. यावर ट्रम्प यांनी अध्यादेशाचा तोडगा काढला होता. सोमवारी त्यांनी नव्या सुधारित अध्यादेशावर साक्षरी केली असून यामध्ये एक बदल करत पूर्वीच्या यादीतून इरकाला वगळले आहे. पूर्वी सात मुसलमान देशांत सीरिया, इराण, इराक, लीबिया, सुदान, येमेन आणि सोमालिया या देशातून येणाऱ्या शरणार्थींवर बंदी घालण्यात आली होती. ट्रम्प यांनी मागील महिन्यात मुस्लीम मूलतत्त्वावाद्यांना प्रवेशबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतरच्या काळात ६० हजार व्हिसा तूर्त रद्द करण्यात आले आहेत, असे परराष्ट्र खात्याने म्हटले होते.
ही सरसकट सर्व मुस्लिमांवरील बंदी नसून त्यातून कट्टरतावादी मुस्लीम व दहशतवाद्यांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते. तसेच राष्ट्रीय सुरक्षा हा आमचा सर्वात मोठा अग्रक्रम आहे. कायदेशीर स्थायी नागरिक, दुहेरी नागरिकत्व असलेले पासपोर्टधारक लोक यांना फटका बसणार नाही, राजनैतिक, नाटो व संयुक्त राष्ट्र व्हिसा असलेल्यांना अडचणी येणार नाहीत, असे सांगितले होते.