दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने नौशेरा सेक्टरमधील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. पाकिस्तानी लष्कराकडून घुसखोरांना मदत केली जात असल्याचे भारतीय सैन्याने म्हटले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सीमा रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यासोबतच पाकिस्तानमधून घुसखोरीचे प्रमाणही वाढले होते. या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत नौशेरा सेक्टरमधील पाक लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त झाल्याची माहिती भारतीय सैन्याचे मेजर अशोक नरुला यांनी दिली. बर्फ वितळत असल्याने आणि मार्ग खुले झाल्याने घुसखोरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. पण घुसखोरांना रोखण्यासाठी सैन्य सज्ज असल्याचे नरुला यांनी सांगितले. नरुला यांनी भारतीय सैन्याच्या कारवाईचा व्हिडीओ जारी केला आहे.

९ मे रोजी भारतीय सैन्याने पाक सैन्याला लक्ष्य केले. रॉकेट लाँचर, अँटी टँक गाईड मिसाईल, ग्रेनेड लाँचरचा वापर या कारवाईत करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.या कारवाईत पाक सैन्याचे किती नुकसान झाले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. मात्र भारताच्या कारवाईने पाकला मोठा हादरा बसल्याचे सांगितले जाते.

शनिवारी नौगाममध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांसोबत सैन्याची चकमक झाली होती. या चकमकीत तीन जवान शहीद झाले होते. तर चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. सुमारे २४ तास ही चकमक सुरु होती. या पार्श्वभूमीवर भारताने पाकमध्ये केलेली कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. भारताच्या कारवाईवर अद्याप पाकिस्तानने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण कुलभूषण जाधव प्रकरणानंतर आता सैन्याने पाक लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याने दोन्ही देशांमधील तणावात भर पडण्याची शक्यता आहे.