जम्मू काश्मीरच्या पुंछमध्ये सोमवारी पुन्हा एकदा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. यामध्ये पेट्रोलिंग टिमचे दोन जवान शहीद झाले. या जवानांच्या मृतदेहांची पाकिस्तानकडून विटंबना करण्यात आल्याने देशभरात संतापाचे वातावरण आहे. पाकिस्तानच्या या नापाक कृत्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण सूट देण्यात आली आहे. पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर देण्याची मागणी देशभरातून जोर धरु लागली आहे. सोमवारी पाकिस्तानच्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त करत सात पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पाकिस्तानकडून दोन भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना करण्यात आल्यानंतर लष्कराला सर्व पर्यायांचा वापर करण्याची पूर्ण मुभा देण्यात आली आहे. ‘जवानांचे हौतात्म्य वाया जाणार नाही,’ असे संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. यासोबतच पाकिस्तानच्या या कृत्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल, असे लष्कराने म्हटले आहे. सोमवारी लष्करप्रमुख बिपिन रावत काश्मीर खोऱ्यात होते. लष्करी कारवायांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी रावत यांनी काश्मीरचा दौरा केला.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीदेखील पाकिस्तानच्या कृत्याचा निषेध केला आहे. पाकिस्तानच्या अमानवी कृत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला पूर्ण सूट दिली जावी, अशी मागणी अमरिंदर सिंग यांनी केली आहे. सोमवारी पाकिस्तानच्या विशेष दलाकडून पुंछ सेक्टरमध्ये उखळी तोफांचा मारा करण्यात आला. यावेळी पाकिस्तानी जवानांनी भारतीय हद्दीत प्रवेश करुन दोन भारतीय जवानांची हत्या केली. यानंतर या दोन्ही जवानांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले होते. पाकिस्तानी सैन्याच्या या कृत्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे. पाकिस्तानला तोडीसतोड प्रत्युत्तर देण्याची प्रतिक्रिया देशभरात पाहायला मिळते आहे.