लष्कराच्या जवानांना पहिल्यांदाच बुलेट प्रूफ हेल्मेट मिळणार आहेत. कानपूरमधील एका कंपनीने १.५८ लाख हेल्मेट तयार करण्यासाठी १७० ते १८० कोटी रुपयांचा व्यवहार केला असून, हेल्मेटचे उत्पादनही सुरू केले आहे, अशी माहिती ‘एनडीटीव्ही’ला मिळाली आहे. गेल्या दोन दशकांत लष्कराकडून हेल्मेटसाठी दिलेली सर्वात मोठी ‘ऑर्डर’ आहे, असे सांगितले जाते.

नव्याने देण्यात येणारे हेल्मेट पुढील तीन वर्षांच्या आत या कंपनीकडून मिळण्यास सुरूवात होणार आहे. ही कंपनी बुलेट प्रूफ जॅकेट आणि हेल्मेटचे उत्पादन करणारी कंपनी आहे. जगभरातील लष्करांना अशा प्रकारची उत्पादने या कंपनीकडून पुरविली जात आहेत. या कंपनीकडून दिले जाणारे हेल्मेट अत्याधुनिक पद्धतीने तयार करण्यात आली आहेत. अगदी कमी अंतरावरून ९ एमएमची गोळी झाडल्यास त्याचा आघात झेलण्याची क्षमता या हेल्मेटमध्ये आहे. हेल्मेट सुविधांयुक्त असून, त्याच्या आत संपर्क साधण्यासाठीचे उपकरणही लावले जाऊ शकते, अशी माहिती देण्यात आली आहे.

एका दशकापूर्वी भारतीय निमलष्करी दलाच्या जवानांना इस्त्रायली बनावटीचे ओआर-२०१ हेल्मेट देणे बंद केले होते. तर लष्कराच्या जवानांना तुलनेने जड असलेले स्वदेशी बनावटीचे हेल्मेट देण्यात आले होते. मात्र, ते युद्ध परिस्थितीत वापरण्यास योग्य नव्हते. एखाद्या विशेष कारवाईदरम्यान भारतीय लष्कराच्या जवानांना बुलेट प्रूफ ‘पटका’ परिधान करावा लागत असे. लष्कराला सध्या पुरवल्या जाणाऱ्या हेल्मेटने केवळ पुढील आणि मागील बाजूचे संरक्षण करता येते. याशिवाय या हेल्मेटचे वजन साधारण अडीच किलोपर्यंत असते. दरम्यान गेल्या वर्षी मार्चमध्ये सरकारने टाटा एडव्हान्स्ड मटेरियल लिमिटेडकडून ५० हजार नवीन बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी करण्यासाठी आपत्कालीन निधी उपलब्ध करून दिला होता. अत्याधुनिक सुविधांनी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण असलेले जॅकेट खरेदी करण्याचा लष्कराचा विचार असून त्याचे वरिष्ठ पातळीवर मूल्यांकन केले जात आहे, असे समजते.