भारतीय लष्कराकडून सध्या पाकिस्तान सीमेवरील स्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आता लष्कर हळूहळू आपला मोर्चा चीन सीमेकडे वळवताना दिसत आहे. चीनसोबतच्या ४ हजार ५७ किलोमीटर सीमेवर भारतीय लष्कर लक्ष केंद्रीत करत असल्याचे दिसते आहे. लष्कराकडून आता माऊंटन स्ट्राईक कोअरची नवी तुकडी स्थापन करण्यात येणार आहे. ही नवी तुकडी चीनच्या सीमेवर तैनात असणार आहे. यासोबतच या वर्षाच्या अखेरीस भारतीय लष्कराचे जवान लडाखमध्ये सरावदेखील करणार आहेत.

पठाणकोटमध्ये मुख्यालय असलेली ७२ इन्फंट्री डिव्हिजन पुढील तीन वर्षांमध्ये पूर्णपणे सक्रीय होईल, अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली आहे. ‘एका ब्रिगेडपासून या डिव्हिजनच्या बांधणीला सुरुवात होणार आहे. मात्र जेव्हा ही डिव्हिजन पूर्णपणे कार्यान्वित होईल, तेव्हा डिव्हिजनमध्ये तीन ब्रिगेड असतील. यासाठी साधारणत: तीन वर्षांचा कालावधी लागेल,’ अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

लष्कराच्या १७ माऊंटन कोअरची सुरुवात २०१४ मध्ये झाली होती. चीनच्या पिपल लिबरेशन आर्मीला टक्कर देण्यासाठी तोफखाना, हवाई सुरक्षा, इंजिनियर ब्रिगेडने सुसज्ज असलेल्या १७ कॉर्प्सला लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत आणि पाकिस्तानी सीमेलगत तैनात करण्यात येणार आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. १७ माऊंटन कोअरमध्ये ९० हजार २७४ जवान असणार आहेत. ‘१७ कोअरमध्ये अण्वस्त्रसज्ज बॅलेस्टिक क्षेपणास्त्र, लढाऊ विमाने, रणगाडे आणि ब्रम्होस क्षेपणास्त्र डागणारी यंत्रणा असेल,’ असे लष्करप्रमुख रावत यांनी सांगितले.

सीमावर्ती भागात मुलभूत सोयीसुविधांची असलेली कमतरता लष्कराची सर्वात मोठी अडचण ठरते आहे. सीमावर्ती भागातील ७३ पैकी अवघ्या २४ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या भागातील चीनच्या वाढत्या सामर्थ्याला टक्कर देण्यासाठी अधिक वेगाने मुलभूत सुविधांची उभारणी होणे आवश्यक आहे. या भागात तैनात करण्यासाठी १४५ एम ७७७ अल्ट्रा लाईट हॉवित्झर तोफा भारतात दाखल झाल्या आहेत. भारताने ७३७ मिलियन डॉलर्सला हॉवित्झर तोफा अमेरिकेकडून खरेदी केल्या आहेत. १८ मे रोजी दोन हॉवित्जर तोफा भारतीय लष्करात दाखल झाल्या असून त्यांची चाचणीदेखील पूर्ण झाली आहे.