जम्मू काश्मीरमधील नागरिकाला सीमा ओलांडण्याच्या आरोपाखाली अटक केल्याचा दावा पाकिस्तानने गुरुवारी केला. सोहन लाल असे त्याचे नाव असून पंजाब प्रांतातील आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरी केल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.
काश्मीरच्या आर. एस . पुरा भागातील रहिवासी असलेल्या घारा राम यांचा मुलगा सोहन लाल (३६) हा बुधवारी लाहोरपासून ९०किमी अंतरावरील सियालकोट जिल्ह्य़ातील भारत पाकिस्तान सीमेवरून पाकिस्तानी हद्दीत घुसखोरी करताना ताब्यात घेतल्याचे पंजाब प्रांताच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.ताब्यात घेतलेल्या भारतीय व्यक्तीला पुढील चौकशीसाठी गुप्तचर यंत्रणांच्या हवाली करण्यात आले आहे.