भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे (आयओए) अध्यक्ष एन. रामचंद्रन यांची डोकेदुखी संपलेली नाही. भारतीय बॅडमिंटन संघटनेने (बीएआय) त्यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव करण्याचे जाहीर केले आहे.
बीएआयचे अध्यक्ष अखिलेश दास गुप्ता व सरचिटणीस विजय सिन्हा यांनी आयओएला पत्र पाठवत विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करीत त्यामध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यास परवानगी देण्याविषयी विनंती केली आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, आयओएच्या घटनेनुसार आम्ही अविश्वासाचा ठराव मांडणार आहोत.
दास गुप्ता हे आयओएचे उपाध्यक्ष आहेत. यापूर्वी हॉकी इंडिया, भारतीय बोलिंग संघटना व झारखंड ऑलिम्पिक संघटना यांनी रामचंद्रन हटाव मागणी केली होती व अविश्वासाच्या ठरावाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्रिपुरा ऑलिम्पिक संघटनाही त्यास पाठिंबा देणार असल्याचे समजते.
विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्याचा अधिकार अध्यक्ष किंवा कार्यकारिणी समितीला आहे. तसेच विविध संलग्न राज्य संघटनांपैकी निम्म्याहून अधिक सदस्यांनी लेखी स्वरूपात मागणी केली तर अशी सभा अध्यक्षांकडून आयोजित केली जाऊ शकते. जर अध्यक्षांनी ही सभा घेण्याबाबत असमर्थता व्यक्त केली तर संलग्न सदस्यांकडून ही सभा घेतली जाऊ शकते.