सरते वर्ष पुस्तकांनी गाजवले. भारतीय समाजजीवन, संस्कृती आणि धर्म यांच्यातील गुंतागुंतीची गुंफण लेखनप्रतिभेच्या बळावर काही लेखकांनी ‘वादग्रस्त’ बनवली. या साऱ्यांचे रक्षक म्हणवणाऱ्यांनी सरकारला अशा पुस्तकांवर बंदी घालण्यास भाग पाडले. तर देशाची सर्वोच्च सत्ता संपादन केल्यानंतर जबाबदार व्यक्तींनी देशहिताची काळजी घेताना कसे ‘मौन’ पाळले, याची जाहीर वाच्यता पुस्तकातून केली. राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेला दणके दिले. सरकारी कामकाजाचा भाग म्हणून अधिकार वापरताना ‘आपल्या मार्गा’चे समर्थन करणारा नवा पायंडा पुस्तक लिहून काहींनी घालून दिला. एकूणच २०१४ मध्ये पुस्तकांनी भारतीय वाचकांची अभिरुची काय आहे, ते त्यावर कसे व्यक्त होतात, हे काही नामवंतांच्या लेखणीने दाखवून दिले.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार संजय बारू यांच्या सिंग यांच्यावरील ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकाने खळबळ उडवून दिली. देशाची समृद्ध नैसर्गिक संपत्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळ्या सोन्याची अर्थात, कोळशाची केंद्रीय पातळीवरील निर्णयाने कशी राख केली, याचा उलगडा करणारे पी. सी. परख यांचे ‘क्रुसेडर ऑर कॉन्स्पिरेटर? कोलगेट अ‍ॅण्ड अदर ट्रथ’, तर परराष्ट्र  नीतीतील मुरब्बी नटवर सिंह यांच्या ‘युवर्स सिन्सिअरली’ अशा पुस्तकांनी सत्ताधाऱ्यांना ‘लक्ष्य’ केले.
पुस्तकांच्या विश्वात असे ‘घोटाळ्यांच्या देशा’चे आख्यान लावले जात असताना नव्या पिढीला प्रेरणा देणारे आत्मकथनपर लिखाणही झाले. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे ‘प्लेइंग इट माय वे’ नसिरुद्दीन शाह यांच्या पुस्तकाने वाचकांच्या मनाला प्रतिकूल परिस्थितीतही उभारी दिली. व्यवसाय, उद्योग, साहित्य आणि रोजच्या जगण्यातील कादंबऱ्या याचबरोबर व्यक्तिमत्त्व विकास आणि पाककृतींच्या पुस्तकांनीही वाचकांच्या शेल्फवर जागा मिळवली.
२०१४ च्या आरंभीलाच ‘पेंग्विन बुक्स’ प्रकाशनाने अमेरिकेत राहून भारतीय समाजजीवनावर अभ्यास करणाऱ्या वेन्डी डॉनिजर यांच्या ‘द हिंदुज : अ‍ॅन अल्टरनेटिव हिस्टरी’ या पुस्तकाने देशात मोठे वादळ निर्माण केले.  डॉनिजर यांच्या  पुस्तकाला ‘शिक्षा बचाव आंदोलन समिती’ने जोरदार हरकत घेत बंदी मागणी केली. सरकारने त्यानंतर पुस्तकाच्या सर्व प्रती मागवून त्या नष्टही केल्या.
परदेशस्थ लेखकांचे भारतीय समाजजीवनाविषयीचे असे लिखाण विपर्यस्त म्हणून त्याविरोधात उभ्या ठाकणाऱ्या संघटना आणि लेखकाने या साऱ्याची तमा न बाळगता अभिव्यक्तिस्वातंत्र्याची सर्व शक्तिनिशी जपणूक करावी, या चर्चेला तोंड फुटले.

भारतातील ढासळती राजकीय परिस्थिती. अशा स्थितीत कुणाला न बोलण्याची मुभा राहणार नसेल तर मला त्याची मोठी चिंता वाटते. माझ्या पुस्तकाबाबत जे काही झालं; मला याबद्दल संताप आहेच, पण याविषयी माझ्या मनात निराशाही दाटून राहिली आहे. – वेन्डी डॉनिजर, लेखिका