कॅनडातील भारतीय मुलाने व्यक्तिगत वापराचे नवे सर्च इंजिन (शोधयंत्र) तयार केले असून, ते गुगलपेक्षा ४७ पट अचूक आहे. हा मुलगा दहावीतील असून अवघा सोळा वर्षांचा आहे. अनमोल टुकरेल असे त्यांचे नाव असून, गुगल सायन्स फेअरमध्ये त्याने जागतिक स्पर्धेत १३ ते १८ वयोगटात सर्च इंजिन प्रकल्प सादर केला होता.
गुगलचे व्यक्तिगत सर्च इंजिन आहे हे त्याला तेव्हा माहीत नव्हते. या सर्च इंजिनची संकेतावली तयार करण्यास त्याला साठ तास लागले आहेत. आज्ञावली म्हणजे सॉफ्टवेअरची चाचणी त्याने ‘द न्यूयॉर्क टाइम्स’मधील बातम्यांपुरती मर्यादित ठेवली होती, त्यात त्याला अचूक निष्कर्ष मिळाले. गुगलच्या साधारण सर्च इंजिनपेक्षा २१ टक्के अचूकता व गुगलच्या साध्या सर्च इंजिनपेक्षा ४७ टक्के जास्त अचूकता त्याने गाठली आहे. टुकरेल हा आंतरवासीयता (इंटर्नशिप) पूर्ण करण्यासाठी बंगळुरू येथे आला असताना त्याला गुगलने व्यक्तिगत सर्च इंजिन आधीच तयार केल्याचे समजले. मग त्याने त्यात अधिक वेगवान व अधिक अचूकतेचा टप्पा गाठण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने विविध क्षेत्रांत रस असलेले काल्पनिक वापरकर्ते तयार केले. टुकरेल याच्या मालकीची कंपनीही असून, टॅकोकॅट कॉम्प्युटर्स असे तिचे नाव आहे.