भारतीय लष्कराने कारवाईचा व्हिडीओ जाहीर केल्यावरही पाकिस्तानचा रडीचा डाव सुरु आहे. भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईचा दावा खोटा असल्याचे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे. पाक लष्कराच्या प्रवक्त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

मंगळवारी भारतीय सैन्याचे मेजर जनरल अशोक नरुला यांनी नौशेरामधील पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याची माहिती दिली होती. घुसखोरांना मदत करणाऱ्या चौक्यांवर सैन्याने कारवाई केली होती. भारताने चौक्या नेस्तनाबूत करतानाचा व्हिडीओदेखील जाहीर केला आहे. पण यानंतरही पाकिस्तानने भारतीय सैन्याच्या कारवाईचा दावा फेटाळून लावला आहे. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचा आणि पाकिस्तानी सैन्याने निवासी भागावर गोळीबार केल्याचा दावा खोटा असल्याचे पाक सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानला लगाम घालण्यासाठी भारत निर्णायक पाऊल उचलू शकते असा इशारा दिला होता. तर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राईकची आठवण ठेऊन कृती करावी, असा सज्जड दम दिला होता. १८ सप्टेंबर रोजी झालेल्या उरी हल्ल्यावर भारताने सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून उत्तर दिले होते. सर्जिकल स्ट्राईकमध्ये भारताने दहशतवाद्यांचे तळ उदध्वस्त केले होते. त्यानंतर भारतीय सैन्याकडून ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे.