माऊंट एव्हरेस्ट गिर्यारोहणासाठी बंद करण्याचा निर्णय नेपाळ सरकारने घेतल्यामुळे, जगातील हे सर्वोच्च शिखर पादाक्रांत करण्याच्या संधीसाठी भलीमोठी रक्कम भरणाऱ्या शेकडो भारतीय गिर्यारोहक हताश झाले आहेत.
२५ एप्रिल रोजी झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे ८ हजार ८४८ मीटर उंचीच्या या शिखरावरून फार मोठे हिमस्खलन होऊन २२ गिर्यारोहक ठार झाले, तर जगातील अनेक देशांमधील गिर्यारोहक एव्हरेस्टच्या बेस कँपर अडकून पडले. यानंतर नेपाळ सरकारने हे शिखर गिर्यारोहणासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला.
जमशेदपूर येथील प्रदीपचंद्र साहू व त्यांची पत्नी चेतना या दोघांचा एव्हरेस्टवर चढण्याचा प्रयत्न या वर्षी दुसऱ्यांदा अयशस्वी ठरल्यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली. एव्हरेस्ट गाठणारी पहिली भारतीय महिला बचेंद्री पाल यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेल्या या जोडप्याने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये केलेला प्रयत्नही अशाच हिमवादळात अनेक शेर्पा मरण पावल्यामुळे निष्फळ ठरला होता.
सध्या गिर्यारोहकांसाठी, विशेषत: भारतीय गिर्यारोहकांसाठी अतिशय दु:खद परिस्थिती आहे. गिर्यारोहणासाठी पैसा किंवा प्रायोजक मिळणे कठीण असल्यामुळे त्यांच्यापैकी अनेक जण एव्हरेस्टवर चढण्यासाठी कर्ज घेतात किंवा आपली मालमत्ता विकतात, असे पाल यांनी सांगितले.
 साहू दाम्पत्याने आसामच्या दोन गिर्यारोहकांसह या पर्वतावरून खाली उतरण्यास सुरुवात केली आहे. सात दिवसांच्या कालावधीत दुसऱ्यांदा एव्हरेस्ट सर करण्याचा गिनीज रेकॉर्ड नोंदवण्याची आशा असलेल्या अरुणाचल प्रदेशमधील अंशु जमसेनपा यांच्याही आशा धुळीला मिळाल्या आहेत.
नेपाळ सरकारच्या निर्णयामुळे खिन्न झाले असतील असे अनेक गिर्यारोहक आहेत, परंतु त्यांची सुरक्षितता ही  प्राधान्याची बाब आहे. गिर्यारोहकांनी लवकरात लवकर खाली उतरावे, असा माझा वैयक्तिक सल्ला आहे, कारण जिवाची जोखीम पत्करली जाऊ शकत नाही, असे टाटा स्टील अ‍ॅडव्हेंचर फाऊंडेशनच्या प्रमुख असलेल्या बचेंद्री पाल म्हणाल्या.