भारताच्या आर्थिक विकासदरात वाढ होत असून आगामी शतकात भारत चीनलाही मागे टाकेल, असा प्रचार उच्चरवाने सुरू असला तरी प्रत्यक्षात आयात-निर्यातीत घसरणच सुरू असल्याने आर्थिक आघाडीवर चिंतेचीच स्थिती आहे. एप्रिलमध्ये निर्यातीत थोडीथोडकी नव्हे, तर १४ टक्के घट झाली असून घसरणीचा हा सलग पाचवा महिना आहे.
पेट्रोलियम आणि दागदागिन्यांची निर्यात खालावल्याने हा फटका बसला असून निर्यात २२ अब्ज डॉलरवर आली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात देशाने २५ अब्ज डॉलरची निर्यात केली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये निर्यातीत ७.२७ टक्के अशी लक्षणीय वाढ नोंदवली गेली होती. जागतिक मंदी आणि कच्चे तेल, धातू व काही उत्पादनांच्या किमतींत घट झाल्याने निर्यात खालावल्याचे सांगण्यात येते. पेट्रोलियम निर्यातीत उणे ४६.५ टक्के, दागदागिन्यांच्या निर्यातीत उणे १० टक्के तर वस्त्रनिर्यातीत उणे ८.३ टक्के अशी नकारात्मक घट झाली आहे.
आयातही घटली
देशाची आयातही ७.४८ टक्क्य़ांनी घटली असून ती ३३ अब्ज डॉलरवर आली आहे. तेल आयात ४२.६५ टक्क्य़ांनी घट झाली आहे. सोन्याची आयात मात्र १.७५ अब्ज डॉलरवरून ३.१३ अब्ज डॉलवर गेली आहे. मार्च महिन्यात देशाची निर्यात २१ टक्क्य़ांनी घटली. सहा वर्षांतली ही सर्वात मोठी घट ठरली आहे. २०१४-१५मध्ये देशाने ३४० अब्ज डॉलर निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले होते. ते साध्य झाले नाही आणि निर्यात ३१०.५ अब्ज एवढीच झाली.
तूट वाढली
आयात-निर्यातीत घट झाल्याने व्यापारी तूटही वाढली असून एप्रिल २०१५मध्ये ही व्यापारी तूट ११ अब्ज डॉलरवर गेली आहे. गेल्या वर्षी ती याच महिन्यात १०.८ अब्ज डॉलर होती.