पोलिस आणि गॅंगस्टर यांच्यामधील चकमक आता साधारण बाब झाली आहे. अशा चकमकी नेहमीच वाद विवादाचा मुद्दा राहिल्या आहेत. काही लोकांसाठी चकमक फेम (एन्काऊंटर स्पेशालिस्ट) अधिकारी हे एखाद्या नायकाप्रमाणे असतात. तर काहींसाठी ते मानवाधिकारांचे उल्लंघन करणारे असतात. मात्र, गुन्हेगारांसह पोलिस विभागासाठी आणि सर्वसामान्य नागिरकांसाठी हे अधिकारी नेहमीच उत्सुकतेचा विषय राहिले आहेत.

पोलिसांपासून पळ काढण्यादरम्यान, जर कोणी गॅंगस्टर किंवा गुन्हेगार गोळीबारात मारला गेला तर याला चकमक (एन्काऊंटर) म्हणतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पोलिस अधिकाऱ्यांबाबत सांगणार आहोत. ज्यांची ओळखच आता ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ अशी होऊन गेली आहे.

( प्रदीप शर्मा )
प्रदीप शर्मा यांना देशातील सर्वात खतरनाक एन्काऊंटर स्पेशालिस्ट मानले जाते. त्यांनी आतापर्यंत ११३ गुन्हेगारांचा एन्काऊंटर केल्याचे सांगितले जाते. लखन भैया एन्काऊंटर प्रकरणानंतर ते चर्चेत आले होते. त्यांच्यावर राम नारायण गुप्ताच्या एन्काऊंटरचा कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यामुळे २००९-१० च्या दरम्यान त्यांना पोलीस सेवेतून निलंबितही करण्यात आले होते. मात्र, २०१३ मध्ये न्यायालयाने त्यांना निर्दोष घोषित केले होते.

( दया नायक )
दया नायक हे प्रसिद्ध एन्काऊंटर स्पेशालिस्टपैकी एक आहेत. बॉलिवूडमधील सिनेमा ‘अब तक छप्पन’ आणि ‘कगार’ हे सिनेमे त्यांच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगण्यात येते. तसेच ‘डिपार्टमेंट’ या सिनेमात संजय दत्तची भुमिका ही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच लिहिण्यात आली होती. २००७ पर्यंत दया नायक यांनी ३०० गुन्हेगारांना अटक केली होती. तर ८३ एन्काऊंटर त्यांनी केले होते. १९९७ मध्ये छोटा राजन गँगसोबत झालेल्या चकमकीत त्यांना दोन गोळ्याही लागल्या होत्या.

( प्रफुल भोसले )
कोणत्याही प्रकरणाच्या तपासात प्रफुल भोसले यांचा हातखंडा होता. महाराष्ट्रातील गुन्हेगारी विश्वात ते प्रसिद्ध होते. मात्र, त्यांनी अद्याप किती जणांचे एन्काऊंटर केले याची ठोस माहिती उपलब्ध नाही. तरीही त्यांनी ९० गुन्हेगारांना यमसदनी धाडल्याचे सांगितले जाते.

( दिवंगत विजय साळसकर )
एके काळी मुंबईतील कुख्यात अरूण गवळी गँगचे कट्टर विरोधक असणाऱ्या साळसकर यांच्या नावाने गुन्हेगारांचा थरकाप उडत असे. साळसकर यांनी आपल्या २५ वर्षांच्या पोलिसी सेवेच्या करियरमध्ये ९० गुन्हेगारांचे एन्काऊंटर केले आहे. २६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यादरम्यान दहशतवादी अजमल कसाबने एके ४७ रायफलमधून त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला होता. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या सर्वोच्च बलिदानासाठी त्यांना अशोक चक्र किताबाने सन्मानित करण्यात आले आहे.

( सचिन हिंदुराव वाजे )
सचिन वाजे यांना मुंब्रा येथिल मुस्लिमबहुल भागात शांतता राखण्यासाठी तैनात करण्यात आले होते. वाजे यांनी मुन्ना नेपाळी, कृष्णा शेट्टी आणि लष्कर ए तोयबा च्या दहशतवाद्यांसह ६३ गुन्हेगारांचा खात्मा केला आहे. आशियातील पहिल्या क्रेडिट कार्ड घोटाळ्यातील आरोपीलाही त्यांनीच अटक केली होती. आता त्यांनी नोकरीतून राजीनामा दिला असून ते शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत.

( रविंद्र आंग्रे )
रविंद्र आंग्रे यांनी एकट्याच्या जीवावर ठाण्यात फोफावलेल्या संगटीत गुन्हेगारीला मोडून काढले होते. ५० एन्कांऊंटर केल्यानंतर आंग्रे यांनी आपल्या अर्धशतकाची पार्टीही दिली होती.

( दिवंगत राजबीर सिंह )
दिल्ली पोलिसांमधील राजबीर सिंह हे एकटे असे अधिकारी आहेत ज्यांना १३ वर्षांतच बढती देऊन सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) बनवण्यात आले होते. राजबीर यांनी ५० एन्कांऊंटर केले होते. एका प्रॉपर्टीच्या व्यवहारात त्यांच्या २० वर्षे जुन्या मित्राने त्यांच्याकडून काही पैसे घेतले होते आणि त्यानंतर या मित्रानेच त्यांची गोळी मारून हत्या केली होती.