श्रीलंकेच्या समुद्र हद्दीत घुसून भारतीय मच्छीमार तस्करी आणि बेकायदा मच्छीमारीच्या कारवाया करीत असतात. त्यामुळे श्रीलंकेचे नाविक दल त्यांच्यावर कारवाई करते. भारताचे मच्छीमार अनेकदा समुद्रात बेकायदा कारवाया करीत असतात, असे भारतीय तटरक्षक दलाने मद्रास उच्च न्यायालयास सोमवारी सांगितले. दरम्यान, तटरक्षक दलाच्या या भूमिकेचे तामीळनाडूत तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भारतीय मच्छीमारांनी बेकायदेशीररीत्या श्रीलंकेच्या हद्दीत घुसखोरी केली आणि त्यानंतर श्रीलंकेचे नौदल व त्यांच्यात काही संघर्ष उत्पन्न झाला तर त्या वेळी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपण घेऊ शकत नाही, असेही तटरक्षक दलाकडून न्यायालयास स्पष्ट करण्यात आले. भारतीय मच्छीमारांच्या सुरक्षेची जबाबदारी भारतीय तटरक्षक दल घेत नसल्याची याचिका त्यांच्या अधिकाऱ्यांविरोधात करण्यात आली असता, त्या दाव्याचा प्रतिवाद करणारे प्रतिज्ञापत्र तटरक्षक दलाचे उपायुक्त के. आर. नौतियाल यांनी न्यायालयास सादर केले.