भारताच्या परराष्ट्र सचिवांची पाकिस्तान भेट स्वागतार्ह असून, या भेटीत काश्मीरसह सर्व मुद्दय़ांवर चर्चा होईल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानला आपल्या शेजाऱ्यांसोबत शांततापूर्ण संबंध हवे असल्यामुळे भारतीय परराष्ट्र सचिवांच्या भेटीचे आम्ही स्वागत करतो. ते येथे आले, तर आम्ही त्यांच्याशी काश्मीरसह सर्व मुद्दय़ांवर चर्चा करेल, असे शरीफ यांनी ‘कौन्सिल ऑफ पाकिस्तान न्यूजपेपर एडिटर्स’च्या बैठकीत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शरीफ यांच्यासह इतर ‘सार्क’ देशांच्या प्रमुखांना दूरध्वनी करून विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांच्या चमूंना शुभेच्छा दिल्या.
 यानंतर नवे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्या पाकिस्तान भेट जाहीर करण्यात आली होती. ही ‘क्रिकेट शिष्टाई’ म्हणजे भारत-पाक संबंधांमध्ये गेली सहा महिने आलेली कटुता नाहीशी करण्याचा प्रयत्न मानला जात आहे.