दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी एका मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केल्याच्या प्रकरणातील फाशीची शिक्षा झालेला आरोपी मुकेश सिंग याची बीबीसीसाठी घेण्यात आलेली मुलाखत ८ मार्चला महिलादिनी प्रसारित करण्यात येणार होती. पण आता केंद्रीय गृहमंत्रालयाने बीबीसीला ती प्रसारित करू नये असे कळवले आहे. दरम्यान, ती इतरत्र प्रसारित होऊ नये याची जबाबदारी माहिती व प्रसारण मंत्रालय व माहिती तंत्रज्ञान खात्यावर टाकण्यात आली आहे. न्यायालयाने ही मुलाखत दाखवण्यास पुढील आदेश मिळेपर्यंत मनाई केली आहे.
गृहमंत्रालयाने ही मुलाखत घेणाऱ्या चित्रपट निर्मात्या लेस्ली उदविन यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग अवलंबण्याचे ठरवले आहे. तुरुंगामध्ये अशा मुलाखती घेण्याबाबत ज्या अटी व शर्ती आहेत त्या बदलून टाकण्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सूचित केले आहे.
महिलाच बलात्कारासारख्या घटनांसाठी कारणीभूत असल्याच विधान करून ‘निर्भया’ प्रकरणातील आरोपीचे उदात्तीकरण या मुलाखतीद्वारे करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप सर्वपक्षीय सदस्यांनी  बुधवारी लोकसभेत केला.  काँग्रेसच्या महिला खासदार रंजीत रंजन यांनी या मुद्यावर केंद्र सरकारचे लक्ष्य वेधले.
दरम्यान, दिल्ली येथे मुख्य महानगर दंडाधिकारी संजय खनगवाल यांनी ही मुलाखत प्रसारित किंवा प्रकाशित करण्यास मनाई हुकूम जारी केला आहे.
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दोन्ही सभागृहात असे सांगितले की, माहितीपटात असलेली ही मुलाखत प्रसारित होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तिहार तुरुंगात असलेल्या फाशीच्या गुन्हेगाराची मुलाखत घेण्याची परवानगी कशी देण्यात आली याची चौकशी केली जाईल. कुठल्याही परिस्थितीत ही मुलाखत प्रसारित करू दिली जाणार नाही.
दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सांगितले की, मुलाखतीस परवानगी काही शर्तीवर देण्यात आली होती व कायद्याविरोधात काही केले जाणार नाही असे बजावण्यात आले होते. दरम्यान, राज्यसभेत विरोधी पक्षांच्या महिला खासदार हौद्यात जमल्या व त्यांनी तिहार तुरुंगातून गुन्हेगाराने दिलेल्या मुलाखतीविषयी कारवाईची मागणी केली. त्यानंतर समाजवादी पक्षाच्या खासदार जया बचन यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सभात्याग केला.

भारतीय पुरुषांची मानसिकता लपवता कशाला?.
खासदार अनू आगा व जावेद अख्तर यांनी वेगळा सूर लावत सांगितले की, आरोपीने केलेल्या विधानांवरून भारतीय पुरुषांची मानसिकता दिसते त्यामुळे वास्तवापासून दूर पळण्याचे कारण नाही. आपण प्रश्नाला सामोरे का जात नाही असे आम्ही सांगू इच्छितो.
हे तुरुंगातील गुन्हेगाराचे मत नाही तर भारतीय पुरुषी मानसिकतेचे मत आहे त्यामुळे सगळे छान चालले आहे अशी ढोंगबाजी करण्यात काही अर्थ नाही असे अनू आगा यांनी सांगितले.  
गीतकार जावेद अख्तर म्हणाले की, हा माहितीपट तयार करण्यात आला ही चांगली गोष्ट आहे.
भारतातील करोडो पुरुषांना आता ते बलात्काऱ्यासारखाच विचार करतात हे कळेल व हे तुम्हाला घाणेरडे वाटेल पण त्यांनी विचार केला पाहिजे हे तर खरेच आहे.