नायजेरियन नागरिकाच्या मालकीच्या जहाजावरून अपहरण करण्यात आलेल्या १७ भारतीय कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन भारताने नायजेरियन सरकारला केले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभा सदस्या के एन बालगोपाल यांना पत्राद्वारे याबाबतची माहिती दिली.
मार्क्‍सवीदी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार असलेल्या बालगोपाल यांना लिहिलेल्या पत्रात पंतप्रधानांनी म्हटले आहे की, एमटी रॉयल ग्रेस या जहाजावर काम करणाऱ्या १७ कर्मचाऱ्यांचे १० महिन्यांपूर्वी सोमालियाच्या समुद्री डाकूंनी अपहरण केले होते. या घटनेची भारत सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार सातत्याने नायजेरियन सरकारच्या संपर्कात आहे. तसेच जहाजाच्या नायजेरियन मालकाकडे कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याबाबत पाठपुरावा करावा, अशी विनंती करण्यात आली असून संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या नियमांनुसार राजनैतिक पातळीवरही प्रयत्न सुरु असल्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बालगोपाल यांना सांगितले.