भारत ‘मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट’ (एमक्यूएम) या संघटनेच्या बंडखोरांना मदत करून कराचीत अशांतता निर्माण करीत आहे, असा पाकिस्तानचा आरोप असून आता हा प्रश्न संयुक्त राष्ट्रांपुढे उपस्थित करण्याचे त्यांनी ठरवले आहे.
पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रातील दूत मलीहा लोधी यांनी याबाबत सरकारशी सल्लामसलत केली असून भारताच्या ह्सतक्षेपाचा प्रश्न संयुक्त राष्ट्रात उपस्थित करण्याची रूपरेषा ठरवली. बीबीसीने अलीकडेच दिलेल्या वृत्तानुसार, मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट या पक्षाला भारताची आर्थिक मदत असून तेच कराचीत अशांतता निर्माण करीत आहेत. भारताने मात्र हा आरोप निराधार असल्याचे म्हटले होते. मुत्ताहिदा कौमी मुव्हेमेंटनेही हा आरोप फेटाळला असून आपल्या पक्षाचा भारताच्या ‘रॉ’ या गुप्तचर संघटनेशी काही संबंध नाही असे या पक्षाचे प्रमुख अस्ताफ हुसेन यांनी म्हटले आहे. पाकिस्तानने भारताविरोधातील आरोपांची चौकशी सुरू केली असून बीबीसीच्या वृत्ताबाबत ब्रिटन सरकारकडे आणखी माहिती मागितली आहे. एमक्यूएमच्या दोन नेत्यांनी लंडन येथे पक्षाला भारताकडून निधी मिळत असल्याचे सांगितले होते. बीबीसीची बातमी खरी ठरली तर भारताविरोधात पाकिस्तानला सज्जड पुरावा मिळणार आहे व त्याच्या आधारे जगात भारताविरोधात प्रचार करण्याची त्यांची तयारी आहे. सरकारने त्यांच्या राजदूत लोधी यांच्याशी या प्रश्नावर चर्चा केली व संयुक्त राष्ट्रात नेमके काय वातावरण आहे, भारताविरोधातील कृतीला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळेल की नाही याबाबत चाचपणी केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला सप्टेंबरमध्ये भेट देणार आहेत. पाकिस्तानी दूरचित्रवाणी वाहिन्यांनीही पाकिस्तान भारताला संयुक्त राष्ट्रांमध्ये कोंडीत पकडण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे.

शरीफ -लष्करप्रमुख चर्चा
मंगळवारी पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी चर्चा केली. याबरोबरच दोघांनी अंतर्गत सुरक्षा आणि दहशतवादाविरुद्धची लढाई या प्रश्नांवरही चर्चा केल्याचे ‘डॉन ऑनलाइन’ने म्हटले आहे. फुटीरतावादी कारवाया करण्यासाठी कराचीतील मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेण्टला (एमक्यूएम) भारताकडून आर्थिक साहाय्य होत असल्याचे वृत्त अलीकडेच एका परदेशी वाहिनीने प्रसारित केले होते. त्याबाबत पाकिस्तानने चौकशी सुरू केली आहे.