भारतातील माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कर्मचाऱयांना जगातील इतर देशांच्या तुलनेत अत्यंत कमी वेतन दिले जाते, अशी माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतातील मधल्या फळीतील व्यवस्थापकाला सरासरी ४१,२१३ डॉलर इतके वेतन दिले जाते. तर याच पदावर स्वित्झर्लंडमध्ये काम करणाऱयाला त्याच्या चार पट अधिक वेतन मिळते, असे दिसून आहे.
‘मायहायरिंगक्लब डॉट कॉम’ने चालू वर्षात केलेल्या सर्वेक्षणानुसार, जगातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वात कमी वेतन मिळणाऱया देशांच्या यादीमध्ये भारताचा सातवा क्रमांक लागतो. गेल्यावर्षीपेक्षा यंदा त्यामध्ये एका क्रमांकाने घट झाल्याचेही दिसून आले आहे. आधी म्हटल्याप्रमाणे भारतातील व्यवस्थापकाला ४१,२१३ डॉलर इतके वेतन मिळत असताना बल्गेरियातील कर्मचाऱय़ाला सर्वात कमी २५,६८० डॉलर, व्हिएतनाममधील व्यक्तीला ३०,९३८ डॉलर तर थायलंडमधील व्यक्तीला ३४,४२३ डॉलर इतके वेतन मिळते.
दुसऱ्या बाजूला स्वित्झर्लंडमधील या पदावरील कर्मचाऱ्याला सर्वाधिक म्हणजे १,७१,४६५ डॉलर इतके वेतन दिले जाते. त्या खालोखाल बेल्जियमचा क्रमांक लागतो. बेल्जियममध्ये १,५२,४३० डॉलर इतके वेतन मिळते, असे या सर्वेक्षणात दिसून आले.
कमी दरात काम होत असल्यामुळेच पाश्चिमात्य देशांतून भारतातच माहिती-तंत्रज्ञानाची काम देण्याकडे मोठा कल असल्याचे दिसून आले. मात्र, भविष्यात यामध्ये बदल झालेला असेल, असे भविष्य सर्वेक्षणात वर्तविण्यात आले आहे.