मुंबईत ७/११ रोजी घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोटातील आरोपींना फाशीची आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आल्याने बुधवारी या प्रकरणाची सुनावणी संपली. तथापि, २००६ मध्ये घडविण्यात आलेले हे बॉम्बस्फोट इंडियन मुजाहिद्दीनच्या (आयएम) स्वतंत्र गटाने घडवून आणल्याचे तीन राज्यांच्या पोलिसांनी केलेल्या तपासात आढळल्याची बाब सूचित करणारा धक्कादायक दस्तऐवज ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या हाती
लागला आहे. गुजरात पोलिसांनी कोठडीत एका आरोपीची चौकशी केली त्याची १८ सप्टेंबर २००९ रोजी ध्वनिचित्रफीत तयार करण्यात आली. ही फीत ‘दी इंडियन एक्स्प्रेस’कडे उपलब्ध आहे. बटाला हाऊस चकमकीत ठार झालेला आयएमचा कमांडर आतिफ अमिन, इसिसमध्ये सहभागी होऊन चकमकीत ठार झालेला मोहम्मद ‘बडा’ साजिद, जिहादी शहानवाझ हुसेन आणि अबू रशीद अहमद यांच्या मदतीने आपण बॉम्ब पेरल्याची कबुली आयएमचा सादिक इसरार शेख याने दिल्याचे या फितीमधून स्पष्ट होत आहे. सिमीशी संबंध असलेला सदर गोपनीय दस्तऐवज १२ आरोपींच्या बचावासाठी उपलब्ध करून देण्यात आला नाही. बॉम्बस्फोट घडवून १८९ निष्पापांचे बळी घेणाऱ्या आरोपींना बुधवारी शिक्षा ठोठावण्यात आली. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने आरोपपत्रात अन्य १७ जणांच्या नावांचा समावेश केला असून त्यापैकी १३ जण पाकिस्तानचे आहेत आणि ते सर्व फरार आहेत. कोठडीतील चौकशीदरम्यान सादिक शेखने सांगितले की, आयएमचा पाकिस्तानस्थित आश्रयदाता अमीर रझा याने, आपण रियाज भटकळमार्फत स्फोटके उपलब्ध करून देऊ, असे सांगितले आणि रियाझने मंगळुरूमध्ये स्फोटकांची व्यवस्था केली. त्यानंतर आतिफ मंगळुरूला गेला आणि ३५-३७ किलो स्फोटके त्याने ताब्यात घेतली. त्यानंतर सर्व पाच जणांनी उपनगरी गाडय़ांची पहिल्या वर्गाची तिकिटे काढली, सर्वानी गाडय़ांचे वेळापत्रक मिळविले. त्यानंतर पिशव्या आणि कुकर खरेदी करण्यात आले. त्यानंतर आम्ही पाच जणांनी सात कुकरमध्ये बॉम्ब तयार केले, असे शेखने सांगितले. त्यानंतर ११ जुलै रोजी दुपारी दोन वाजता आम्ही निघालो, साडेचार तासांनी बॉम्बचा स्फोट होईल अशा पद्धतीने वेळ निश्चित करण्यात आली. गाडय़ांमध्ये गर्दी कधी असेल याचा अंदाज घेतला आणि मी चार वाजता प्रथम निघालो, असे शेखने सांगितले. आपल्याला पाकिस्तानमध्ये कशा पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले तेही शेखने सांगितल्याचे फितीतून स्पष्ट होत आहे. वाराणसी आणि दिल्लीतील हल्ल्यांबाबतची माहितीही त्याने दिली. शेखने आंध्र प्रदेश पोलिसांना माहिती दिली त्यानुसार, आमच्या गटाने शिवडी येथे डेक्कन सहकारी गृहनिर्माण संस्थेत एक सदनिका भाडय़ाने घेतली आणि तेथे बॉम्ब तयार केले व त्यांचा वापर ७/११ रोजी केला. कर्नाटकमधून मुंबईत ही स्फोटके मोहम्मद यासिन सिद्दीबापा या आयएमच्या एका प्रमुख म्होरक्याने आणली, असे शेखने सांगितले.