अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संघीय संचार आयोगाच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाच्या अजित वरदराज पै यांची निवड केली आहे. ट्रम्प यांच्या प्रशासनात समाविष्ट करण्यात आलेले पै हे चौथे भारतीय वंशाचे अधिकारी आहेत.

संचार आयोगाच्या प्रमुखपदी नेमणूक केल्यामुळे मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आभारी आहे, असे पै या वेळी म्हणाले. अजित पै संघीय संचार आयोगाचे ३४ वे अध्यक्ष आहेत. नव्या प्रशासनात, नव्या सहकार्यासोबत आणि काँग्रेस सदस्यांसोबत काम करताना अमेरिकी नागरिकांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याचे आव्हान असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संघीय संचार आयोगाच्या आयुक्त मिग्नॉन क्लेबर्न यांनी पै यांच्या निवडीचे स्वागत केले असून ते अमेरिकी नागरिकांमधील एकता टिकवून ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. पै यांच्यासोबत काम करताना अमेरिकेतील सार्वजनिक सुरक्षा आणि ग्राहक संरक्षणासाठी सर्वोच्च योगदान देता येईल, असेही क्लेबर्न म्हणाल्या.

संघीय संचार आयोग ही अमेरिकी सरकारच्या नियंत्रणाखालील स्वतंत्र संस्था आहे. या संस्थेकडे रेडिओ, टी.व्ही, उपग्रह आणि केबल यासंबंधी पूर्ण अधिकार आहेत.

ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्याची मेक्सिकोची सशर्त तयारी

मेक्सिकोच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा आदर ठेवण्यात आला तर आपले सरकार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चेला तयार आहे, असे मेक्सिकोचे अध्यक्ष एन्रिक पेना निएटो यांनी म्हटले आहे. चर्चेसाठी मेक्सिको कोणत्या आधारावर तयार आहे त्याची रूपरेषा निएटो यांनी आपल्या भाषणांत मांडली. स्थलांतरितांचा आणि ते आपल्या घरी पाठवीत असलेल्या पैशांबाबत आदर ठेवणे, आर्थिक एकात्मता ठेवणे आदींचा चर्चेच्या मुद्दय़ांमध्ये समावेश आहे.